देवरुख:- सोनवी घडगडी परिसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यालय, सोनवडे येथे वार्षिक शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डाॅ. हेमंत विलास चव्हाण, आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख, संस्थाध्यक्ष प्रभाकर सनगरे, माजी संस्थाध्यक्ष मोहन दर्डे, संस्था पदाधिकारी अभिमन्यू शिंदे, अनिल नांदळजकर, सिमा खेडेकर, नवनाथ खामकर, माजी संचालक विजय पांचाळ, सरपंच श्रद्धा गुरव, मुख्याध्यापक शिवाजी बंडगर, माजी शिक्षक विष्णू परीट, प्रशालेचे विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनानंतर ईशस्तवन व स्वागत पद्याने करण्यात झाली. यानंतर उपस्थित मान्यवरांना गुलाब पुष्प व प्रमुख अतिथींचा शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये १०वी परीक्षेत प्रथम आलेली सुप्रिया संसारे , द्वितीय पार्थ पांचाळ, तृतीय श्रावणी जोशी आणि प्रत्येक विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना, तसेच ५वी ते ९वी इयत्तेत प्रथम ,द्वितीय, तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसह गरजू, हुशार, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना पुस्तकांसाठी देणगी स्वरूपात ठेवलेल्या निधीतून रोख रक्कम देण्यात आली. आदर्श विद्यार्थी वेदांत पांचाळ, तर आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार निधी जाधव यांना शिल्ड व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पुस्तक परीक्षण स्पर्धतील छोट्या गटातील विजेते श्रुतिका संसारे, अस्मि मेंगाल व आदित्य मोहिते यांना, तर मोठ्या गटातील तेजल पांचाळ, निधी जाधव व मधुरा शिंदे या विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली. यानंतर विजय पांचाळ, मोहनराव दर्डे आणि विष्णू परिट यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रमुख अतिथी प्रा. डॉ. हेमंत चव्हाण यांनी स्वतःचे विद्यार्थी दशेतील अनुभव विद्यार्थ्यांसमोर कथन केले. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांची सविस्तर माहिती सांगितली. ध्येय निश्चित करून कष्ट करण्याची तयारी ठेवली तर जीवनात यशस्वी होता येते, याबाबतची अनेक महनीय व्यक्तींची उदाहरणे देऊन विवेचन केले. वेळ ही महत्त्वाची बाब असून, योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. विद्यार्थ्यांनी सर्वांशी नम्रतेने वागून, अहंकाराचा त्याग करावा असे, आवाहन केले. नियमित वाचनाचे महत्त्व प्रा. डॉ. चव्हाण यांनी याप्रसंगी विशद केले. या प्रशालेतून दहावीनंतर देवरुख महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांची माहिती देऊन, त्यांचेही कौतुक केले. उपस्थित विद्यार्थ्यांना आपल्या शाळा संस्थेला विसरू नका, असे आवाहन करताना शाळेच्या नेहमी संपर्कात राहण्याविषयी, तसेच भविष्यात सर्वांनी यशस्वी झाल्यावर आपल्या उत्पन्नातील काही भाग शाळेतील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत म्हणून नक्की करा, असा शुभ संदेश देऊन विद्यार्थ्यांना व संस्थेच्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात प्रभाकर सनगरे यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांची माहिती देऊन, भविष्यातील संस्थेच्या उपक्रमांबाबतचा आढावा घेऊन बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या बक्षीसासाठी संस्थेला हितचिंतकानी, दानशूर व्यक्ती व शिक्षण प्रेमीनी सढळ हस्ते दिलेल्या ठेवी व रोख स्वरूपातील रकमांसाठी देणगीदारांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षिका सायली बनकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुजय सरदेसाई यांनी केले.
माध्यमिक विद्यालय, सोनवडे येथे वार्षिक शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न

Leave a Comment