चिपळूण : मुंबई–गोवा महामार्ग ओलांडत असताना एका पादचाऱ्याला कारने जोरदार धडक दिल्याची घटना २८ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कळंबस्ते फाटा येथे घडली. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला असून कारचालक घटनास्थळी न थांबता भरधाव वेगाने पसार झाला.
निजामुद्दीन हसनअली शेख (वय ३६, रा. निरबाडे) असे जखमी पादचाऱ्याचे नाव आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी अज्ञात कारचालकाविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद अब्दुल रऊफ कुदबुद्दीन शेख (वय ४१, रा. निरबाडे) यांनी दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरून कारचालक भरधाव वेगाने वाहन चालवत होता. त्याच वेळी रस्ता ओलांडणाऱ्या निजामुद्दीन शेख यांना कारने धडक दिली. अपघातानंतर कारचालकाने थांबण्याऐवजी घटनास्थळावरून पलायन केले.
या घटनेचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी वाहनचालकाचा शोध घेतला जात आहे






