GRAMIN SEARCH BANNER

सावर्डे वहाळफाटा येथे गाडीसमोर दुचाकी आडवी लावून चालकाला मारहाण; दोन सख्ख्या भावांवर गुन्हा

Gramin Varta
453 Views

चिपळूण : तालुक्यातील सावर्डे वहाळफाटा येथे चारचाकी गाडीसमोर दुचाकी आडवी लावून चालकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. २५ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तरंग बिअर शॉपीसमोर हा प्रकार घडला. याप्रकरणी मारहाण आणि शिविगाळ करणाऱ्या दोघांविरोधात सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी विनायक अनंत कदम (वय ४४, रा. खांडोत्री देवूळवाडी, ता. चिपळूण) हे २५ डिसेंबर रोजी रात्री आपल्या वॅगनआर गाडीने मुंबई-गोवा महामार्गावरून खांडोत्री येथील आपल्या घरी जात होते. ते सावर्डे वहाळफाटा येथील तरंग बिअर शॉपीसमोर आले असता, संशयित आरोपी जयेश जनार्दन भागडे (वय ३५) आणि किरण जनार्दन भागडे (वय ३०, दोघे रा. आबिटगाव दत्तवाडी, ता. चिपळूण) यांनी त्यांची दुचाकी विनायक कदम यांच्या चालत्या गाडीसमोर आडवी लावली. यावेळी जयेश भागडे याने विनायक कदम यांना गाडीतून खाली उतरवून शिविगाळ करण्यास सुरुवात केली.

त्याच वेळी किरण भागडे याने कदम यांच्या मानेच्या डाव्या बाजूला हाताने जोरात फटका मारला, ज्यामुळे कदम खाली पडले. त्यानंतर दोन्ही आरोपींनी संगनमत करून कदम यांना मारहाण केली, शिविगाळ केली आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर विनायक कदम यांनी २६ डिसेंबर रोजी सावर्डे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १२६(२), ११५(२), ३५२, ३(५) आणि मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये जयेश भागडे आणि किरण भागडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Total Visitor Counter

3374666
Share This Article