हापूस आंब्याच्या उत्कृष्टतेला राष्ट्रीय स्तरावर मान्यता
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी स्वीकारला पुरस्कार
रत्नागिरी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘एक जिल्हा एक उत्पादन (ODOP)’ उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्याने २०२४च्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सुवर्ण गटात (Golden Category) देशात पहिला क्रमांक पटकावून मानाचा मुकुट मिळवला आहे. दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या या भव्य सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी रत्नागिरीच्या हापूस आंब्याचा विशेष उल्लेख करत जिल्ह्याच्या कामगिरीचे कौतुक केले.
भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या भारतीय उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागामार्फत (DPIIT) संपूर्ण देशातील जिल्ह्यांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली होती. महाराष्ट्रातून निवड झालेल्या १४ जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीचा समावेश होता. या जिल्ह्यांपैकी अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या ५ जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीने अव्वल स्थान मिळवत सुवर्णपदकाचा मान पटकावला.
या पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्ह्याने ‘हापूस आंबा’ हे विशेष उत्पादन म्हणून सादर केले होते. २६ डिसेंबर २०२४ रोजी भारतीय उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाचे सहव्यवस्थापक ताशी डोर्जे शेर्पा यांनी जिल्ह्याला भेट देऊन हापूस आंबा उत्पादन व प्रक्रियेसंबंधी उद्योगांची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी ‘ODOP’ उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली होती.
या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आणि जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आसगेकर यांनी उपस्थित राहून जिल्ह्याचा सन्मान स्वीकारला. कोकण विभागातील ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश महाराष्ट्रातील निवड झालेल्या १४ जिल्ह्यांमध्ये होता, त्यामधून रत्नागिरीने प्रथम क्रमांक मिळवणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
हा यशस्वी प्रवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या प्रोत्साहनातून, तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रयत्नांतून शक्य झाला आहे. त्यांच्या प्रेरणेतून रत्नागिरीने ‘पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम’ आणि ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ अंतर्गत सलग दोन वर्षे – २०२३-२४ आणि २०२४-२५ – उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
‘ODOP’ राष्ट्रीय पुरस्काराचा उद्देश जिल्ह्यातील विशेष उत्पादनांचा विकास, मूल्यवर्धन, रोजगार निर्मिती आणि बाजारपेठांतील सशक्त सादरीकरण याला चालना देणे हा आहे. या पुरस्कारामुळे रत्नागिरीच्या हापूस आंब्याला केवळ राष्ट्रीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही नवी बाजारपेठ मिळेल. स्थानिक उद्योजक, शेतकरी आणि कारागिरांना रोजगार, प्रशिक्षण व आर्थिक स्थैर्य मिळेल. तसेच जिल्ह्यातील पर्यटन आणि एकूणच आर्थिक घडी अधिक भक्कम होण्यास मदत होईल. रत्नागिरीच्या हापूस आंब्याला मिळालेला हा सन्मान संपूर्ण कोकणच्या अभिमानाची पर्वणी ठरली आहे.