रत्नागिरी : भाट्ये समुद्रकिनारी निष्काळजीपणे महिंद्रा थार गाडी चालवून वाळूत रुतल्याची घटना घडली होती. या प्रकारामुळे समुद्रकिनारी गोंधळ उडाला होता. गाडी चालवणाऱ्या युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण गजानन भेलेकर (वय २०, रा. मालेगाव, जि. नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.
ही घटना ९ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. काळ्या रंगाची महिंद्रा थार (एम.एच.-४०/सी.एक्स./८२६२) ही गाडी भाट्ये समुद्रकिनाऱ्याच्या वाळूत रुतलेली स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली. नागरिकांनी तत्काळ रत्नागिरी शहर पोलिसांना याची माहिती दिली.
फिर्यादी संग्राम मानसिंग झांबरे (पोलिस कॉन्स्टेबल क्र. १७७, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते भाट्ये चेकपोस्टवर कर्तव्यावर असताना नागरिकांकडून वाळूत अडकलेल्या थार गाडीची माहिती मिळाली. त्यांनी पोकॉ/४८० पाटील यांच्यासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, भूषण गजानन भेलेकर (वय २०, रा. मालेगाव, जि. नाशिक) हा तरुण आपली थार गाडी समुद्रकिनाऱ्याच्या वाळूमध्ये आणि पाण्याजवळ चालवत असल्याचे आढळून आले.
वाळूत रुतलेली गाडी बाहेर काढण्यासाठी मोठा प्रयत्न करण्यात आला. आरोपीने निष्काळजीपणे स्वतःच्या तसेच गाडीतील मित्रांच्या जिवाला धोका निर्माण केला होता.
या प्रकरणी भूषण भालेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील चौकशी सुरू केली असून, पर्यटकांनी व नागरिकांनी समुद्रकिनारी सुरक्षिततेचे भान राखण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
भाट्ये समुद्रकिनारी वाळूत थार गाडी रुतली, नाशिकमधील तरुणावर गुन्हा
