दाभोळे/सिकंदर फरास : संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे गावात सध्या माकडांच्या मोठ्या टोळीने धुमाकूळ घातला असून, या माकडांच्या उपद्रवामुळे ग्रामस्थ आणि व्यापारी वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत माकडांचा सतत वावर असल्याने नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत असून गेल्या काही दिवसांत यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
गावात उच्छाद मांडलेली ही माकडे थेट घरांच्या कौलांवर आणि पत्रांवर उड्या मारत आहेत.ज्यामुळे नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच घराजवळील झाडे आणि पावसाळ्यात नागरिकांनी आवडीने लावलेल्या पालेभाज्यांचेही ही माकडे नुकसान करत आहेत.
केवळ घरेच नव्हे, तर दाभोळे बाजारपेठेतील व्यावसायिकांनाही या माकडांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दुकानांमधून खाण्याच्या वस्तू पळवून नेण्याचे प्रकार वाढले आहेत.विशेषतः श्रावण महिन्यात बाहेर विक्रीसाठी ठेवलेली केळी व इतर फळे उघड्यावर ठेवणे दुकानदारांना अशक्य झाले असून, त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.गावात थैमान घालणाऱ्या या वाढत्या उपद्रवावर वनविभागाने तातडीने योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.
दाभोळे गावात माकडांचा उच्छाद; ग्रामस्थ आणि व्यावसायिक त्रस्त
Leave a Comment






