गुहागर: गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्र. १ मध्ये एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अर्धनग्न अवस्थेत, हातात धारदार कुऱहाड घेऊन एका मद्यधुंद व्यक्तीने शाळेच्या आवारात प्रवेश करत विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये मोठी दहशत निर्माण केली. या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातीलच असलेल्या या व्यक्तीने बुधवारी चक्क तीन वेळा शाळेत घुसून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक आणि ग्रामस्थ यांनी तातडीने गुहागर पोलीस, गटशिक्षणाधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे या घटनेबद्दल तक्रार दाखल केली आहे.
या व्यक्तीने केवळ दहशतच निर्माण केली नाही, तर मुख्याध्यापकांसह शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिवीगाळ करत अश्लील भाषेत धमकावले. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील उपलब्ध आहे. या गंभीर घटनेनंतर शाळा व्यवस्थापन समितीने त्वरित गावाची सभा घेऊन, संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.
शाळेसारख्या पवित्र ठिकाणी झालेल्या या प्रकारामुळे पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल जोशी आणि माजी सरपंच संतोष आंब्रे यांनी या मद्यपी व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. शाळेतील विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची सुरक्षा अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.