राजापूर: सुट्ट्यांसाठी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेलेल्या एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे दोन लाख वीस हजार रुपयांहून अधिक किमतीचा सोन्याचा ऐवज आणि चांदीच्या वस्तू लंपास केल्याची घटना राजापूर तालुक्यातील कळसवली वाणीवाडी येथे उघडकीस आली आहे. फिर्यादी परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कळसवली, वाणीवाडी येथील सेवानिवृत्त शिक्षक शरद त्र्यंबक साखळकर (वय ६८) हे त्यांच्या पत्नीसह दि. ०८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता पनवेल, जि. रायगड येथे त्यांच्या मुलांकडे राहण्यासाठी गेले होते. घर बंद करताना त्यांनी घराची चावी शेजारी राहणाऱ्या मधुसुदन गोपाळ महाडदळकर यांच्याकडे दिली होती.
फिर्यादी बाहेरगावी असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी दि. ०८/१०/२०२५ ते दि. १६/१०/२०२५ रोजी रात्री ११.०० वाजेच्या पूर्वी कधीतरी त्यांच्या घरात प्रवेश केला.
दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजण्याच्या सुमारास, फिर्यादींचे शेजारी राहणारे वैभव श्रीकांत ठाकुरदेसाई यांनी साखळकर यांना फोन करून सांगितले की, “तुमच्या घराचे मागचे आणि पुढचे दोन्ही दरवाजे उघडे आहेत, तसेच घरातील सर्व सामान विस्कटलेले आहे आणि घरातील कपाट फोडलेले आहे.”
घटनेची माहिती मिळताच फिर्यादी शरद साखळकर हे पत्नी आणि मुलांसोबत पनवेलहून तातडीने कळसवली येथील घरी परतले. दि. १६/१०/२०२५ रोजी रात्री ११.०० वाजता घरी पोहोचल्यावर त्यांना घरात वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या आणि घरफोडी झाल्याचे स्पष्ट झाले.
चोरट्यांनी घरातील कपाट फोडून त्यातील मौल्यवान वस्तू चोरल्या. यामध्ये सुमारे १,००,०००/- रुपये किमतीचे ४० वर्षांपूर्वीचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १,००,०००/- रुपये किमतीच्या २० वर्षांपूर्वीच्या २० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या, २०,०००/- रुपये किमतीचे ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व मोत्याचे दोन जोड कानातले आणि ५००/- रुपये किमतीचे चांदीचे दोन निरंजन, एक अगरबत्ती स्टॅन्ड व चांदीचे करंडे असा एकूण २,२०,५००/- रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेला आहे.
या घटनेनंतर, फिर्यादींनी राजापूर पोलीस ठाण्यात येऊन अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली. राजापूर पोलिसांनी गु.आर. क्र. १९६/२०२५ नुसार भारतीय दंड संहितेच्या (आताच्या भारतीय न्याय संहिता) संबंधित कलमांखाली घरफोडी आणि चोरीचा गुन्हा दाखल केला असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.