GRAMIN SEARCH BANNER

चिपळुणात वीज वाहिनी कोसळून ५ म्हशींचा मृत्यू; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

चिपळूण: शहरालगतच्या कोल्हेखाजण परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विजेच्या तारा अचानक तुटून कोसळल्याने पाच दुभत्या म्हशींचा जागीच मृत्यू झाला असून, एक म्हैस गंभीर जखमी झाली आहे. या दुर्दैवी अपघातामुळे शेतकरी प्रमोद पांडुरंग कदम यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद कदम यांच्या मालकीच्या म्हशी नेहमीप्रमाणे कोल्हेखाजण परिसरातील मोकळ्या जागेत चरण्यासाठी गेल्या होत्या. याचवेळी महावितरणच्या विद्युत वाहक तारा अचानक कोसळल्या. या दुर्घटनेत पाच म्हशींचा जागीच मृत्यू झाला, तर एक म्हैस दोन्ही पायांनी अपंग झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले होते. नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत त्यांच्या निष्काळजीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी शेतकऱ्याला सर्वतोपरी मदत मिळावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. त्यानंतर ग्रामस्थांनीही महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे शासनामार्फत जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी लावून धरली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचे मोठे साधन हिरावले गेल्याने, त्याला तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे.

Total Visitor Counter

2475145
Share This Article