मराठवाड्यात पावसाचा कहर; बचाव कार्यासाठी लष्कराची मदत, चौघांचा मृत्यू

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील काही भागांत रविवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा कहर केला. धाराशिव जिल्ह्यातील परंडा, बीडमधील पाटोदा, शिरूर, जालना शहर यांसह बहुतांश भागांत मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली.

अनेक गावांचा संपर्क तुटला. ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत झाली. नदी – नाल्यांना पूर आला. गेल्या २४ तासांत चार जणांचा मृत्यू झाला. तर ७२ जनावरे दगावली आहेत. ८५ महसूल मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली. पिके पाण्यात गेली आहेत. तर उत्तर महाराष्ट्रात जळगावमध्ये एक जण वाहून गेला

परंडा तालुक्यातील ढगपिंपरी, वडनेर या गावातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराला पाचारण करावे लागले. सायंकाळपर्यंत २७ जणांना बाहेर काढण्यात आले तर आणखी १५० जण अडकलेले आहेत. याच तालुक्यात घरात पाणी शिरून ७० वर्षाच्या देवांगनाबाई नवनाथ वारे यांचा मृत्यू झाला.

धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात पिंपळगाव येथील गोठ्यात बांधलेल्या २० गायी पुरामुळे दावणीला दगावल्या. भूम तालुक्यातील तीन गावांतील सहा कुटुंबांतील एकूण १४ जणांना पुराच्या पाण्यातून हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित बाहेर काढले. परंडा तालुक्यातील वागेगव्हाण, वडनेर आदी परिसरात अडकलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक व सैन्य दलातील जवान प्रयत्न करत होते. चांदणी, उलका, उल्फा या नद्यांना महापूर आला. रुई, दुधी, ढगपिंपरी, देवगाव (खु.), वडनेर, आवारपिंपरी, वागेगव्हाण परिसरातील नदीकाठी व वस्त्यांवर राहत असलेले अडीचशे ते तीनशेजण पाण्यात अडकल्याने या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *