GRAMIN SEARCH BANNER

कास पठारावर आढळला जगातील सर्वात मोठा ‘ॲटलॉस मॉथ’!

Gramin Varta
453 Views

सातारा: जैवविविधतेने समृद्ध असणाऱ्या कास पठारावर जगातील सर्वांत मोठा समजला जाणारा ‘ॲटलॉस मॉथ’ प्रजातीचा पतंग आढळून आला आहे. या पतंगाच्या दर्शनाने कासच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे.

या पठारावर उमलणाऱ्या लक्षावधी फुलांसोबतच विविध प्रजातींच्या फुलपाखरांसोबतच पतंगही आढळतात. यामध्येच या ॲटलॉस मॉथचे दर्शन घडले आहे.

‘ॲटलॉस मॉथ’ प्रजातीचा हा जगातील सर्वात मोठा पतंग समजला जातो. त्याचे दर्शन दुर्मीळ मानले जाते. दक्षिण पूर्व आशियात त्याचा प्रामुख्याने आढळ दिसतो. हा पतंग ज्या प्रदेशात आढळतो, त्या प्रदेशातील जैवविविधता ही समृद्ध असल्याचे मानले जाते. ‘ॲटलॉस मॉथ’च्या याच दर्शनामुळे कास आणि सह्याद्रीचा पश्चिम घाटालगतचा प्रदेश समृद्ध असल्याचे मानले जाते.

हे पतंग दुर्मीळ व जगातील सर्वांत मोठ्या कीटकांपैकी म्हणून ओळखले जाते. हे फुलपाखरू नसून पतंग आहे आणि हे कीटकजन्य आहे. त्यामुळे बऱ्याचदा याला फुलपाखरू म्हटले जाते. फुलपाखराचे पंख उघडझाप करणारे असतात तर पतंगाचे पंख हे लांब व पसरलेले असतात.

निसर्गप्रेमी व अभ्यासक रवी चिखले यांना हा ‘ॲटलॉस मॉथ’ पतंग कास पठारावर आढळून आला. त्यांनी त्याला कॅमेऱ्यात चित्रबद्ध केले. बदामी, तपकिरी आणि किंचित लालसर रंगात असलेला हा पतंग दहा ते साडेअकरा इंच किंवा २५ सेंमी लांबीचा असतो. या पतंगाचे पंख मोठ्या आकाराचे असतात. या पंखाच्या टोकाला नागाच्या तोंडाप्रमाणे चित्ररंगसंगती असते. या नक्षीमुळेच तो शिकारी पक्ष्यांना घाबरवतो. त्याच्या पंखावर मोठे पांढरे ठिपके आहेत. या पंखांवरील नक्षी ही नकाशाप्रमाणे असल्यामुळे त्याला ‘ॲटलॉस मॉथ’ असे म्हणतात, असे पर्यावरण अभ्यासकांनी सांगितले. नरापेक्षा मादी पतंग आकाराने मोठा असतो. ही मादी नराला आकर्षित करण्यासाठी ‘फेरीमोंस’ नावाचे संप्रेरक हवेत सोडते.

या संप्रेरकाचा गंध नरास काही किलोमीटरवरून येतो. या पतंगास तोंड किंवा पचनसंस्था नसते. ते सुरवंट (अळी) अवस्थेत असतानाच पुरेसे अन्न भक्षण करतात. या पतंगाचे आयुष्य जेमतेम पाच ते सात दिवसांचे असते. या अल्प कालावधीत प्रजननाचे कार्य संपल्यावर त्यांचा मृत्यू होतो. मादी पतंग एका वेळेस १०० पासून २०० अंडी घालते. अंडी दहा ते चौदा दिवसांत उबवून त्यातून सुरवंट बाहेर येतो. सुरवंट ३५ ते ४० दिवस सतत झाडांची पाने खातात. त्यानंतर त्याचे कोषात रूपांतर होते. एकवीस दिवसांनंतर कोषातून पुन्हा नवे पतंग बाहेर येतात.

‘ॲटलॉस मॉथ’चे दर्शन सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात प्रामुख्याने घडते. निशाचर असलेला हा पतंग रात्रीच्यावेळी दिव्याच्या प्रकाशाकडे आकर्षित होतात. ते दालचिनी, लिंबू, जांभूळ, पेरू व लिंबूवर्गीय झाडावर अनेकदा आढळतात. जगातील सर्वात मोठ्या पतंगांपैकी हा एक असून तो आशियाच्या जंगलात आढळतो. भारतात रायगड जिल्ह्यातील माणगाव, सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे यापूर्वी ‘ॲटलॉस मॉथ’ आढळले आहेत.

कासमधील उंबरी पठार परिसरात अशा प्रकारच्या शेकडो फुलपाखरांच्या व पतंगांच्या प्रजाती आढळतात. मात्र त्याचा अभ्यास आणि शोध घेणारी यंत्रणा येथे उपलब्ध नसल्याने ही सर्व जैव व वनसंपदा दुर्लक्षित आहे. – रवी चिखले, निसर्गप्रेमी

कास पुष्प पठारावर खवले मांजर, साळींदर, घोरपड यांच्यासह विविध वन्यजीवांचे स्थानिकांना सतत दर्शन होत असते. येथे नरक्या शिकेकाईसह अनेक औषधी वनस्पतीही मोठ्या प्रमाणात आढळतात. फुलांचा प्रदेश असल्याने फुलपाखरांच्या व आता नव्याने पतंगाच्या विविध जातींचेही इथे दर्शन घडते. नुकतेच आढळलेले ‘ॲटलास मॉथ’ हे कास पठरावर प्रथमच आढळले आहे. पश्चिम घाटामध्ये आढळणाऱ्या हा सर्वांत मोठा पतंग आहे. हां पतंग अतिशय मोहक आहे. दुर्मीळ असलेला हा पतंग सहसा दिसत नाही. मानवी वस्तीपासून तो दूर राहतो. त्याचे दर्शन घडल्यास त्याला इजा करू नये. नैसर्गिक अधिवासात मुक्त संचार करू द्यावा. – डॉ मधुकर बाचुलकर, ज्येष्ठ पर्यावरण, अभ्यासक

Total Visitor Counter

2648121
Share This Article