रत्नागिरी :बालविवाह, बालकामगार आणि बाल तस्करी या गंभीर सामाजिक प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी भाकर संस्थेच्यावतीने रत्नागिरी रेल्वेस्थानकावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. बालकांचे हक्क, बाल न्याय आणि महिलांच्या सुरक्षिततेसंबंधी माहिती देण्यासाठी प्लॅटफॉर्म, प्रवासी विश्रांतीगृह तसेच रेल्वेच्या विविध भागांतून जनतेशी थेट संवाद साधण्यात आला.
या उपक्रमात प्रवाशांना चाईल्ड हेल्पलाइन क्रमांक 1098, महिलांसाठी 181 आणि पोलीस सहायता क्रमांक 112 याबाबत जागरूक करण्यात आले. बालकांच्या सुरक्षेसाठी नागरिकांची जबाबदारी अधोरेखित करत, कायदेशीर हक्कांची माहिती देणे आणि योग्य वेळी मदतीसाठी कोणत्या नंबरवर संपर्क साधावा, याचे मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला रेल्वे प्रशासनाचा सक्रिय सहभाग लाभला. रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे प्रमुख एम. एन. रॉय, इन्स्पेक्टर सतीश विधाते, वरिष्ठ वाणिज्य पर्यवेक्षक शुभदा देसाई, सहाय्यक सुरक्षा आयुक्त गोकुळ सोनवणे, सहाय्यक उपनिरीक्षक चौहान यांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.
भाकर संस्थेचे संस्थापक देवेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली सखी वन स्टॉप सेंटरच्या प्रशासक अश्विनी मोरे, महिला व मुलांसाठी विशेष सहाय्य कक्षचे समुपदेशक पवनकुमार मोरे व पूर्वा सावंत, महात्मा फुले समाजसेवा मंडळाचे तालुका समन्वयक निकिता कांबळे व कोमल सोलीम, तसेच भाकर संस्थेच्या कार्यकर्त्या शीतल धनावडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
या उपक्रमामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये बालकांच्या आणि महिलांच्या सुरक्षेबाबत सजगता निर्माण झाली असून, अशा उपक्रमांची नियमित गरज असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
रत्नागिरी रेल्वेस्थानकावर ‘भाकर’ संस्थेच्या वतीने बालकांच्या सुरक्षेसाठी जनजागृती
