चिपळूण : पतीने पत्नीला दरमहा सव्वा लाखांहून अधिकची पोटगी देण्याचे आदेश, चिपळूण न्यायालयाचा निर्णय

Gramin Varta
661 Views

रत्नागिरी : जिल्ह्यातील चिपळूण येथील एका प्रकरणात न्यायालयाने ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय देत एका विवाहित महिलेला आणि तिच्या दोन मुलांना दरमहा एकूण १ लाख २० हजार रुपयांची अंतरिम पोटगी मंजूर केली आहे. कौटुंबिक वादाच्या या प्रकरणात पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी खेड येथील प्रसिद्ध वकील ॲड. सुधीर शरद बुटाला यांनी प्रभावी युक्तिवाद केला, ज्याची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे.

चिपळूणमधील एका महिलेने हक्काच्या व कायदेशीर पोटगीसाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. खटल्याचा अंतिम निर्णय येईपर्यंतच्या खर्चासाठी आणि दैनंदिन निर्वाहासाठी अंतरिम पोटगी मिळावी म्हणून हा अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर सुनावणीदरम्यान ॲड. सुधीर बुटाला यांनी न्यायालयासमोर वस्तुस्थिती मांडत सबळ पुरावे आणि कायदेशीर मुद्दे प्रभावीपणे सादर केले.

पतीची आर्थिक सच्छिद्रता आणि कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन न्यायालयाने ॲड. बुटाला यांचा युक्तिवाद ग्राह्य धरला. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, संबंधित महिलेला स्वतःच्या निर्वाहासाठी दरमहा ५०,००० रुपये, तिच्या दोन मुलांना प्रत्येकी ३०,००० रुपये (म्हणजेच दोन्ही मुलांसाठी एकूण ६०,००० रुपये) आणि राहत्या घरभाड्यासाठी स्वतंत्र १०,००० रुपये दिले जाणार आहेत. अशा प्रकारे दरमहा एकूण १ लाख २० हजार रुपयांची ही रक्कम पत्नी आणि मुलांच्या बँक खात्यात जमा करावी लागणार आहे.

या दणदणीत कायदेशीर विजयामुळे पीडित महिलेला मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून, या महत्त्वपूर्ण निकालाचे चिपळूण, खेड आणि संपूर्ण रत्नागिरी परिसरातून स्वागत होत आहे. तसेच यशस्वी युक्तिवाद करणाऱ्या ॲड. सुधीर शरद बुटाला यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Total Visitors :
4637106
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *