GRAMIN SEARCH BANNER

लांज्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेवर पाच नद्यांचे पाणी, दुग्धाभिषेकाने अनोखी गुरुपौर्णिमा साजरी

Gramin Varta
11 Views

लांजा : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने लांजा येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या वेळी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेवर पाच पवित्र नद्यांचे पाणी व दुधाचा अभिषेक करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा बसस्थानकासमोरील जागेवर बाळासाहेब ठाकरे यांची भव्य प्रतिमा उभारण्यात आली होती. गुरुवारी सकाळी ११ वाजता झालेल्या कार्यक्रमात चंद्रभागा, अर्जुना, काजळी, बेनी व मुचकुंदी या पाच नद्यांचे पाणी व दुधाने अभिषेक करण्यात आला.

या अभिषेक सोहळ्यात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उपजिल्हा प्रमुख रवींद्र डोळस, लांजा तालुका प्रमुख सुरेश करंबेळे, जिल्हा सरचिटणीस परवेश घारे, ज्येष्ठ शिवसैनिक नितीन शेट्ये, पप्पू मुळ्ये, चंद्रकांत शिंदे यांनी सहभाग घेतला. प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर शिवसेनेचे गौरवगीत ध्वनिक्षेपणाद्वारे सादर करण्यात आले व घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

कार्यक्रमास महिला तालुका संघटिका सौ. पूर्वा मुळ्ये, युवा सेना तालुका अधिकारी अभिजित राजेशिर्के, संतोष लिंगायत, विश्वास मांडवकर, विजय जाधव, संजय खानविलकर, दिलीप मुजावर, अल्लाउद्दीन नेवरेकर, राजू सुर्वे, किरण बेर्डे, मंगेश आंबेकर, सतीश पेडणेकर यांच्यासह शिवसेनेचे तालुका व विभागीय पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नेत्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.

Total Visitor Counter

2654426
Share This Article