पालघर: केंद्र शासनाच्या भारत माला प्रकल्पांतर्गत हरित वाढवण बंदराशी जोडणाऱ्या आठ पदरी महामार्गाच्या कामाला गती मिळाली आहे. या महामार्गासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) बुधवारी (ता.३) निविदा प्रसिद्ध केली. एकूण २,५७५ कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पावर होणार आहे.
या महामार्गासाठी पालघर व डहाणू तालुक्यातील २८ गावांतील जमीन संपादित केली जाणार आहे. त्यात वासगाव, चिंचणी, तणाशी, बावडा, वाणगाव, साये, पेट, धामटणे, कोल्हाण, तवा, तसेच पालघर तालुक्यातील नेवाळे, हुमाननगर, शिगाव, खुताड, बोईसर, गारगाव, चिंचारे, आकोली आदी गावांचा समावेश आहे.
जमीन संपादनासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना सक्षम अधिकार देण्यात आले आहेत. महामार्गावरून होणाऱ्या अवजड वाहतुकीचा विचार करून स्थानिकांसाठी दोन स्वतंत्र सेवा मार्ग उभारले जाणार आहेत.
वाढवणसाठी बोईसर-वाणगावदरम्यान नेवाळे स्थानकापासून १२ किमी नवीन मालवाहतूक रेल्वेमार्ग उभारला जाणार आहे. वाढवण महामार्ग व बंदर परिसरात लॉजिस्टिक पार्क, कार्गो हब, एसईझेड आणि कंटेनर पार्किंग विकसित करण्याची योजना आहे.
हा महामार्ग व रेल्वेमार्ग प्रादेशिक विकासासाठी मोठा टप्पा ठरणार असून स्थानिकांना रोजगार, दळणवळण व वाहतूक सुविधांचा मोठा लाभ होणार आहे.
वाढवण महामार्गासाठी २,५७५ कोटींची निविदा; २८ गावांची जमीन संपादित होणार
