मुंबई: आज वरळी डोम येथे एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी जनसागर उसळला असून, बाहेर संततधार पाऊस असतानाही आत जाण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे. वरळी डोम आधीच ‘हाऊसफुल’ झाल्यामुळे अनेक इच्छुकांना बाहेरच थांबावे लागले आहे, यात मनसे आणि शिवसेनेचे अनेक मोठे नेतेही गर्दीत अडकल्याचे चित्र आहे.
कार्यक्रमाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमली असून, आत प्रवेश मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. वरळी डोम पूर्णपणे भरल्याने पोलिसांवर मोठा ताण आला आहे. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
यावेळी जमलेल्या काही नागरिकांनी, “आम्हा मराठी माणसांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया दिली. तर काही जणांनी, “गेल्या २० वर्षांनंतर घडणाऱ्या या इतिहासाचे आम्ही साक्षीदार होणार,” असे म्हणत आपला उत्साह व्यक्त केला.
सध्या तरी वरळी डोमबाहेरील गर्दी कायम असून, पावसाची पर्वा न करता लोक आत जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत.