देवरूख: देवरूख बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे प्रवासी आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. मात्र, हा खड्डा बुजवण्याची इच्छा एसटी प्रशासनाला होत नव्हती. अखेर, देवरूख येथील तरुण आकाश भोपळे याने सामाजिक बांधिलकी जपत मंगळवारी रात्री ११ वाजता स्वखर्चाने हा खड्डा बुजवला. यामुळे एसटी प्रशासन आणि नगरपंचायत प्रशासनाला एकाप्रकारे चपराक बसली आहे.
देवरूख हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून, येथे सर्व शासकीय कार्यालये, बँका, शाळा आणि महाविद्यालये आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी देवरूख येथे बसस्थानक आहे. ग्रामीण भागातील जनता एसटीवर अवलंबून असते. देवरूख बसस्थानकातून मुंबई, पुणे, अक्कलकोट, सावंतवाडी, बोरिवली आदी लांब पल्ल्याच्या बस फेऱ्या मार्गस्थ होतात.
बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ पडलेल्या या खड्ड्यामुळे प्रवाशांचे स्वागतच आदळआपटून होत होते. पावसाचे पाणी साचल्याने हा खड्डा धोक्याची घंटा वाजवत होता. हा खड्डा बुजवण्याची मागणी प्रवासी वर्गातून वारंवार होत होती, मात्र दोन महिने झाले तरी एसटी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले.
अखेर, देवरूख येथील तरुण आकाश भोपळे याने मंगळवारी रात्री ११ वाजता स्वखर्चाने वाळू, खडी आणि सिमेंटचा वापर करून हा खड्डा बुजवला. त्याला निखिल कोळवणकर आणि मारुती बंडगर यांनी सहकार्य केले. आकाशाच्या या सामाजिक बांधिलकीचे देवरूखवासियांनी कौतुक केले आहे. वास्तविक पाहता, एसटी प्रशासन किंवा नगरपालिकेने हा खड्डा भरणे अपेक्षित होते, मात्र प्रशासनाचे काम आकाश या तरुणाने पूर्णत्वास नेले आहे.
देवरूख बसस्थानकातील खड्डा तरुणाने बुजवला; एसटी प्रशासन व नगरपालिकेला चपराक
