GRAMIN SEARCH BANNER

लांजात ईद-ए-मिलाद उत्साहात साजरा; मक्का-मदिनाचा देखावा ठरला आकर्षणाचा केंद्र

Gramin Varta
33 Views

लांजा – इस्लामचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त लांजा शहर आणि तालुक्यात ईद-ए-मिलाद मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या वेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत विशेषत्वाने तयार केलेला मक्का-मदिनाचा देखावा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.

इस्लाम धर्मात ईद-ए-मिलाद हा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि जगभरातील मुस्लिम बांधव हा सण मोठ्या श्रद्धेने साजरा करतात. लांजातही दरवर्षीप्रमाणे यंदाही हा दिवस धार्मिक विधी आणि मिरवणुकीने साजरा करण्यात आला. दुपारी ४ वाजता शहराच्या मध्यवर्ती भागातून, हजरत सय्यद चाँदशहा बुखारी दर्गाह येथून मिरवणुकीचा प्रारंभ झाला. ही मिरवणूक शहरातील मुख्य बाजारपेठ, हनुमान मंदिर, जुनी बाजारपेठ, जि.प. शाळा क्रमांक १ आणि श्री देव चव्हाटा मंदिर जामा मार्गे पुन्हा जामा मशिदीकडे वळली. संपूर्ण बाजारपेठेतून मार्गक्रमण करत ही मिरवणूक संध्याकाळी ७ वाजता दर्गाह येथे परत येऊन तिचा समारोप झाला.

मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस मोठ्या आनंदाने साजरा केला. या वेळी मिरवणुकीत सहभागी झालेल्या आणि उपस्थित असलेल्या सर्व लोकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. मिरवणुकीला शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. समाजातर्फे उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे गुलाब पुष्प देऊन आभार मानण्यात आले. या मिरवणुकीत शहरातील मुस्लिम समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता, ज्यामुळे एकोपा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Total Visitor Counter

3378608
Share This Article