राजापूर : तालुक्यात तांबे पाखाडी पडवे येथे फुरसे जातीच्या सापाने दंश केल्याने एका ३५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हर्षदा हरेश बाईत (वय-३५, रा. तांबे पाखाडी पडवे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २० जुलै २०२५ रोजी दुपारी सुमारे १२.१५ वाजताच्या सुमारास हर्षदा बाईत आणि त्यांची जाऊ योगिता संतोष बाईत या दोघी शेतात बेणणी करत असताना हर्षदा यांच्या हाताच्या बोटाला फुरसे जातीच्या सापाने चावा घेतला.
सर्पदंशानंतर तातडीने योगिता बाईत यांनी गावातील लोकांच्या मदतीने हर्षदा यांना राजापूर येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचार सुरू असतानाच हर्षदा बेशुद्ध पडल्या आणि त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. यामुळे त्यांना पुढील उपचारांसाठी १०८ रुग्णवाहिकेने रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
मात्र, सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे दाखल केल्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रेयस माईल यांनी हर्षदा बाईत यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे तांबे पाखाडी पडवे गावावर शोककळा पसरली आहे.