राजन लाड / जैतापूर
राजापूर तालुक्यातील जैतापूर खाडीवरील पूल हा हजारो नागरिकांचा रोजच्या वापरातील जीवनदिशा ठरला आहे. मात्र सध्या या पुलावर इतके खड्डे पडले आहेत की, वाहतुकीचा हा मुख्य मार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. वाहनचालक खड्डे चुकवताना जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. पुलावरील रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, रस्ता ओळखावा की खड्डे, असा प्रश्न प्रवाशांना पडतो.
रस्त्यात असलेल्या खड्ड्यांचा आकार, खोली आणि संख्या पाहता हे दृश्य पाहून नागरिक संतप्त झाले असून, ठेकेदार आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
या भागातील स्थानिक सरपंच, सदस्य, राजकीय पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. आजवर या पुलाच्या दुरवस्थेवर कोणतीही ग्रामसभा बोलावण्यात आली नाही, ना ठराव मंजूर झाला, ना प्रशासनाला ठोस निवेदन देण्यात आले. त्यामुळे या प्रश्नावर सर्व पातळ्यांवर मौन पाळले जात असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
वाहनचालक दररोज या पुलावरून जीव मुठीत धरून प्रवास करीत आहेत. काही दुचाकीस्वारांना अपघात होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. परंतु या समस्येकडे जबाबदार यंत्रणांचे दुर्लक्ष सुरूच आहे. खड्डे बुजवण्यासाठी कोणताही ठोस निर्णय घेतला गेलेला नाही.
सरकार आणि प्रशासनाला दोष देणे सोपे आहे, पण या भागातील लोकप्रतिनिधींचीही भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे. सोशल मीडियावर फोटो टाकणे, प्रतिक्रिया देणे यापलीकडे काहीच केले जात नाही. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी, ठेकेदार आणि प्रशासन यांच्या निष्क्रियतेचा बळी शेवटी सामान्य जनतेलाच द्यावा लागत आहे.
खड्डे बुजवण्यासाठी सरकार कधी येईल, याची खात्री नाही. मात्र स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन आवाज उठवणे आता अत्यावश्यक झाले आहे. जैतापूर खाडी पूल हा रस्ता नव्हे, तर प्रशासनाच्या अपयशाचा आरसा झाला आहे. तो आरसा आता खड्ड्यांमध्ये स्पष्ट दिसतो आहे. पण तो खड्डा बुजवण्यासाठी पुढे कोण येणार, हे मात्र मोठं प्रश्नचिन्ह आहे.
जैतापूर खाडी पुलावरील खड्ड्यांनी वाहनचालक त्रस्त, ठेकेदार आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संताप
