रत्नागिरी : शहरातील भाटकरवाडा येथे दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री घडलेल्या दुचाकी जाळपोळ प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. या घटनेमागे समाजात तेढ निर्माण करून शहराची शांतता भंग करण्याचा हेतू होता, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी खुद्द तक्रारदार तरुणालाच आरोपी केले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटकही केली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथून रत्नागिरीत जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर, त्यांच्यासमोर आलेली ही पहिलीच मोठी घटना होती. येत्या सणांच्या पार्श्वभूमीवर दोन गटांमध्ये तेढ निर्माण करण्याचा काही समाजकंटकांचा प्रयत्न होता. मात्र, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या तपासकामावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सखोल तपास करत या प्रकरणाचा वेळीच उलगडा केला.
उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईंनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात संशयित आरोपी निहाल मुल्ला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटकही करण्यात आली आहे. तक्रार करणाऱ्यानेच हा प्रकार केल्याचे तपासात उघड झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमागील सत्य समोर आल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पोलिसांच्या या जलद आणि सखोल तपासामुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.
भाटकरवाडा दुचाकी जाळपोळ प्रकरण: माहिती देणाराच निघाला आरोपी!
