GRAMIN SEARCH BANNER

खून प्रकरणी दुर्वास पाटील सह दोघांना 8 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी

Gramin Varta
30 Views

रत्नागिरी (प्रतिनिधी) – रत्नागिरी शहराला हादरवून सोडणाऱ्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी मयत तरुणीचा प्रियकर दुर्वास आणि सह आरोपी विश्वास पवार आणि सुशांत शांताराम नरळकर यांना 8 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

प्रेयसी दोन महिन्यांची गर्भवती असल्याने आणि त्याच्या दुसऱ्या ठरलेल्या लग्नात अडसर ठरत असल्याने हैवान झालेल्या तिच्या प्रियकरानेच साथीदारांच्या मदतीने निर्घृण खून केल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह आंबा घाटात फेकून देण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे. दुर्वास आणि त्याच्या साथीदारांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची क्रूरता आणि पोलिसांना तपासात पुरावे गोळा करण्यासाठी 8 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

घटना अशी की, मिरजोळे येथील रहिवासी भक्ती जितेंद्र मयेकर (वय २६) हिचे दुर्वास दर्शन पाटील (वय २५, रा. जंगमवाडी, वाटद खंडाळा) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या संबंधातून भक्ती गरोदर राहिली आणि तिने दुर्वासकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र, दुर्वासने आधीच दुसऱ्या मुलीशी लग्नाचे ठरवले होते. त्यामुळे, भक्ती त्याच्या लग्नात अडथळा ठरू नये म्हणून त्याने तिला संपवण्याचा क्रूर कट रचला.

या कटात दुर्वासने त्याचे साथीदार विश्वास विजय पवार (वय ४१, रा. बौद्धवाडी,कळझोंडी) आणि सुशांत शांताराम नरळकर (वय ४०, रा. वाटद खंडाळा) यांना सामील करून घेतले. १६ ऑगस्ट रोजी दुपारी ३.०० वाजण्याच्या सुमारास भक्ती मिरजोळे येथील घरातून रत्नागिरीतील प्रशांत नगर येथील आपल्या भाड्याच्या खोलीवर जात असल्याचे सांगून निघाली. त्यानंतर दुर्वासने तिला फोन करून खंडाळा येथे त्याच्या मालकीच्या ‘सायली देशी बार’ मध्ये बोलावले.

रचलेल्या कटनुसार, दुर्वास आणि विश्वास यांनी बारच्या वरच्या खोलीत भक्तीचा केबलने गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी सुशांत नरळकर याच्या वॅगनआर गाडीतून मृतदेह आंब्याघाटात नेण्यात आला आणि घाटाच्या निर्जन भागात फेकून देण्यात आला.

भक्तीचा फोन बंद असल्यामुळे आणि ती परत न आल्याने तिच्या कुटुंबियांना शंका आली. तिचा भाऊ हेमंत मयेकर यांनी शोध घेतला, मात्र ती कुठेही सापडली नाही. अखेर त्यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला असता, भक्ती आणि आरोपी दुर्वास पाटील यांच्या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली. पोलिसांनी दुर्वास पाटीलची कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

या कबुलीनंतर पोलिसांनी दुर्वास पाटील, विश्वास पवार आणि सुशांत नरळकर या तिघांनाही भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासह परिसरात संतापाची आणि हळहळची लाट पसरली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3247304
Share This Article