GRAMIN SEARCH BANNER

राजापूर : वायरमन मृत्यू प्रकरणी अखेर महावितरणच्या ऑपरेटरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Gramin Varta
640 Views

राजापूर : तालुक्यातील पेंडखळे येथील भवानी मंदिर परिसरात विजेच्या खांबावर काम करत असताना शॉक लागून मृत्यू झालेल्या कंत्राटी वायरमन अनिकेत परवडी यांच्या मृत्यू प्रकरणी महावितरणच्या बाह्यस्त्रोत सहाय्यक यंत्रचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल मांजरेकर (वय २८, रा. वरीपेठ, राजापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ऑपरेटरचे नाव असून, राजापूर पोलिसांनी ही माहिती दिली.

महावितरणमध्ये कंत्राटी वायरमन म्हणून कार्यरत असलेले अनिकेत परवडी हे ६ जानेवारी रोजी पेंडखळे येथील प्रताप दत्तात्रय सुर्वे यांच्या बागेत असलेल्या ११ के.व्ही. लाईनच्या पोलवर दुरुस्तीचे काम करत होते. यावेळी अचानक वीजपुरवठा सुरू झाल्याने त्यांना तीव्र शॉक बसला आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी संबंधित जबाबदार व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर महावितरणच्या बाह्यस्त्रोत सहाय्यक यंत्रचालक साहिल मांजरेकर यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

नाटे फिडरवर मृत अनिकेत परवडी आणि दिनेश हातणकर हे दोघे वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होते. दोघांनीही आपण फिडरवर काम करत असल्याची माहिती साहिल मांजरेकर यांना दिली होती. त्यानुसार मांजरेकर यांनी नाटे फिडर बंद केला होता. मात्र दिनेश हातणकर यांचे काम पूर्ण झाल्यानंतर, अनिकेत परवडी अजूनही फिडरवर काम करत असल्याची माहिती असतानाही मांजरेकर यांनी पुन्हा वीजपुरवठा सुरू केला. याच निष्काळजीपणामुळे अनिकेत परवडी यांना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

नाटे फिडरवरील विद्युत प्रवाह सुरू केल्यास अनिकेत परवडी यांचा जीव धोक्यात येऊ शकतो, याची जाणीव असूनही वीजपुरवठा सुरू केल्याने हा अपघात घडल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राजापूर पोलिसांनी साहिल मांजरेकर यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Total Visitor Counter

3225177
Share This Article