रत्नागिरी : तालुक्यातील शिरगाव येथे मिळकतीच्या वादातून एक गंभीर प्रकार समोर आला आहे. येथील एका व्यक्तीने न्यायालयाच्या आदेशाने आपल्या ताब्यात असलेल्या मालमत्तेच्या अधिकृत रस्त्यावर लोखंडी गेट व अडथळा निर्माण केल्याची तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुष्कर माधव दामले (वय ५७, सध्या रा. डोंबिवली, ठाणे) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार, २२ जून रोजी सकाळी ७ वाजून ४ मिनिटांनी शिरगाव येथील सर्व्हे नंबर ६२, हिस्सा नंबर २-अ (२-१) या त्यांच्या मालकीच्या जागेत रविंद्र वैजनाथ दामले यांनी बेकायदेशीरपणे लोखंडी गेट आणि लाकडी गडगा (बांबूचा अडथळा) उभा करून चारचाकी वाहनांचा रस्ता बंद केला.
विशेष म्हणजे, संबंधित मालमत्ता मा. न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादी पुष्कर दामले आणि त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात आहे. असे असतानाही आरोपी रविंद्र दामले यांनी तिथे अडथळा निर्माण केला. तक्रारीत नमूद केल्यानुसार, आरोपीने फिर्यादीला पाहताच, “ग्रामपंचायतीने काढलेले गेट मी परत लावले, तुला माहीत आहे कलेक्टर माझा माणूस आहे, तू आता इथून जिवंत कसा जातोस ते मी पाहतो,” अशी धमकी दिली. आरोपीने सरकारी मोजणीने दिलेल्या खाणाखुणांच्या खुणाही नष्ट केल्याचा आरोप दामले यांनी केला आहे.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६(२), २३८, ३२९(३), ३५१(२) प्रमाणे रविंद्र वैजनाथ दामले यांच्या विरोधात गु.र.नं. २५७/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही तक्रार २३ जून २०२५ रोजी दुपारी ३.५९ वाजता दाखल करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
कलेक्टर माझा माणूस आहे, तू आता इथून जिवंत कसा जातोस ते मी बघतो म्हणत शिरगावात मारहाण, एकावर गुन्हा

Leave a Comment