GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत मंगळवारी संस्कृतविषयक अष्टावधानी विशेष कार्यक्रम

रत्नागिरी: संस्कृतभारती संस्थेच्या रत्नागिरी शाखेतर्फे येत्या मंगळवारी (१२ ऑगस्ट) अष्टावधानी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
अष्टावधान ही एक ज्ञानाची परीक्षा आहे.

विद्वान एकाच वेळी आठ विविध अवधाने सांभाळत क्रमशः सर्व प्रकारांमध्ये आपल्या बुद्धिमत्तेची कमाल दाखवतात. जे विद्वान अशी कला करू शकतात, त्यांना ‘अवधानी’ असे म्हणतात. या आठ अवधानांमध्ये भाषेशी निगडीत विविध गोष्टींचा समावेश असतो. उदाहरणार्थ निषिद्धाक्षरी हे एक प्रकारचे अवधान आहे. यामध्ये प्रश्न विचारणाऱ्याने विद्वानाला काव्यरचना करताना अक्षरांचा निषेध करायचा असतो. उदा. अवधानींनी ‘रा’ या अक्षराने काव्य सुरू केले तर प्रश्न विचारणारा यापुढे ‘म’ हे अक्षर निषिद्ध आहे, असे सांगू शकतो. अशा वेळी अवधानींना अन्य अक्षर योजून काव्य पुढे न्यायचे असते. जसे ‘रा’ नंतर ‘म’ हे अक्षर निषिद्ध असेल तर ‘राघव’ अशी रचना करणे अपेक्षित असते. संख्याबंध नावाच्या एका अवधानामध्ये प्रश्न विचारणाऱ्याने कोणतीही संख्या विचारायची असते. उदा. ४४४ किंवा ६४६ च्या तालिकेत संख्या भरून उभी, आडवी व तिरकी बेरीज समान येईल अशी संख्या अवधानींनी न बघता सांगायची असते.

यासोबतच दिलेल्या ओळीला अनुसरून काव्य रचणे, गायिलेल्या रागाला अनुसरून किंवा त्यातील छंदाला अनुसरून अशुकाव्य रचणे अशीही अवधाने असतात.

अष्टावधानकला दक्षिण भारतात अनेक प्रादेशिक भाषांमध्ये अजूनही चालते. अष्टावधानकलेप्रमाणेच शतावधानकला व सहस्रावधानकलादेखील सादर करणारे विद्वान भारतात आहेत. रत्नागिरीत प्रथमच संस्कृतभाषेतील अष्टावधानकला सादर करण्यात येणार आहे. बंगळुरू येथील युवा विद्वान डॉ. उमामहेश्वर अष्टावधानकलाप्रयोग सादर करणार आहेत.

संस्कृतभारतीच्या रत्नागिरी (दक्षिण) जिल्हा विभागातर्फे आयोजित संस्कृत सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी, १२ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत रत्नागिरीतील झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवनात हा अष्टावधानकला प्रयोग होणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अष्टावधानकला प्रयोग म्हणजे काय, याची सविस्तर माहिती मराठीतून देण्यात येणार आहे.

सर्व संस्कृतप्रेमींनी या अपूर्व कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन संस्कृतभारतीद्वारे करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

2455624
Share This Article