चिपळूण: महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्थेच्या चिपळूण शाखेच्या अध्यक्षपदी प्रा. संतोष गोनबरे यांची, तर कार्याध्यक्षपदी धीरज वाटेकर यांची निवड करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात नुकत्याच संपन्न झालेल्या मसापच्या सर्वसाधारण सभेत सन २०२५-३० साठीच्या कार्यकारिणीचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी प्रा. सोनाली खर्चे आणि मनिषा दामले, कार्यवाहपदी प्राची जोशी, तर कोषाध्यक्षपदी प्रकाश घायाळकर यांची निवड झाली आहे. स्पर्धा समितीमध्ये रविंद्र गुरव, प्रदीप मोहिते, दीपक मोने यांचा समावेश आहे, तर कार्यक्रम समितीची जबाबदारी शिवाजी शिंदे, प्रकाश गांधी, समीर कोवळे, कैसर देसाई यांच्यावर सोपवण्यात आली आहे. वाङ्मय समितीमध्ये मुझफ्फर सय्यद, महम्मद झारे आणि स्नेहा ओतारी यांचा समावेश आहे.
मसाप ही संस्था मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. या सभेत आगामी काळात चिपळूण शाखेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी मसापचे कोकण प्रतिनिधी आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे, भाषा अभ्यासक-समीक्षक अरुण इंगवले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, लोटिस्माचे उपाध्यक्ष सुनील खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.