दोन तरुणींवर लाकडी दांड्याने केला होता प्राणघातक हल्ला; एकीने वाचवला होता जीव
रत्नागिरी : जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील भालावली गावात जानेवारी २०२३ मध्ये घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणात जिल्हा न्यायालयाने आरोपी विनायक शंकर गुरव याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दोन महाविद्यालयीन युवतींवर लाकडी दांड्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात साक्षी गुरव या युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर दुसरी युवती गंभीर जखमी झाली होती.
ही घटना १८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास भालावली येथील वरी गुरववाडी परिसरात घडली होती. गावात सुतक-सुवेर पाळणे आणि गावदेवतेच्या दास्तानाच्या हक्कावरून दोन गटांत तीव्र वाद निर्माण झाला होता. या धार्मिक वादातूनच या प्रकरणाला हिंसक वळण लागले, असे तपासात स्पष्ट झाले.
गावातील नवदुर्गा मंदिराचे दास्तान मयूर गुरव यांच्या कुटुंबाकडे होते. मात्र विरोधी गटाला हे मान्य नव्हते. याच कारणावरून मयूर गुरव व त्यांच्या कुटुंबीयांना वारंवार धमक्या देणे, शिवीगाळ करणे आणि मानसिक त्रास देण्याचे प्रकार घडत होते, अशी तक्रार यापूर्वी पोलिसांत नोंदवण्यात आली होती.
दरम्यान, जुन्या वादातून घरकुल बांधकामावरूनही तणाव वाढला होता. न्यायालयीन स्थगितीमुळे आरोपी विनायक गुरव याच्या मनात मयूर गुरव यांच्या कुटुंबाविरोधात तीव्र राग होता. याच रागातून हा क्रूर हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
घटनेच्या दिवशी मयूर गुरव यांची बहीण साक्षी गुरव आणि शेजारील मुलगी सिद्धी संजय गुरव या दोघी महाविद्यालयातून पायी घरी परतत असताना विनायक गुरव याने रस्त्यात अडवून संतोष गुरव यांच्या आंबा बागेजवळ लाकडी दांड्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. “तुमचे खानदान संपवून टाकीन,” अशी धमकी देत त्याने दोघींच्या डोके व मानेवर जोरदार वार केले. या हल्ल्यात दोन्ही युवती गंभीर जखमी झाल्या.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत दोघींना धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच साक्षी गुरव हिला मृत घोषित करण्यात आले.
या प्रकरणी मयूर गुरव यांनी राजापूर-नाटे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार भादंवि कलम ३०२, ३२६, ५०६ आणि २०१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी आबासो पाटील यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. अनाद्र फणसेकर यांनी यशस्वीपणे बाजू मांडली. एकूण १४ साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी विनायक शंकर गुरव याला खून, प्राणघातक हल्ला, धमकी आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
राजापुरात कॉलेज तरुणीच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेप






