GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण: विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळातर्फे कुंभार्ली येथील कातकरी वाड्यावर दिवाळी साजरी

Gramin Varta
46 Views

गेली १३ वर्षे समाजसेवेची परंपरा कायम

चिपळूण: रत्नागिरी जिल्ह्यातील राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्काराने सन्मानित झालेल्या आणि चिपळूण तालुक्यात गेल्या १३ वर्षांपासून अविरत सामाजिक सेवा करणाऱ्या खेर्डी येथील ‘विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळा’ने यंदाही आपली समाजसेवेची परंपरा जपली आहे. मंडळाचे मार्गदर्शक श्री. दशरथ शेठ दाभोळकर यांच्या प्रेरणेने आणि अध्यक्ष श्री. शशांक भिंगारे यांच्या सहकार्याने मंडळाने आपल्या १३ व्या वर्षाच्या वाटचालीत, आपल्या दिवाळीप्रमाणेच आदिवासी बांधवांची दिवाळी देखील आनंदात आणि उत्साहात साजरी व्हावी या उदात्त हेतूने तालुक्यातील कुंभार्ली येथील कातकरी वाड्यावर जाऊन दिवाळी साजरी केली. बुधवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी अत्यंत आनंदी वातावरणात हा उपक्रम पार पडला.

आदिवासी पाड्यातील लोकांनीही दिवाळीचा आनंद घ्यावा, त्यांना दिवाळीचा फराळ आणि नवे कपडे मिळावेत या उदात्त भावनेतून गेले ८ दिवस ‘दशरथ दाभोळकर मित्र मंडळ’ आणि ‘विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळ’ सक्रियपणे काम करत होते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून आज सकाळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कुंभार्ली येथील कातकरी पाड्यावर भेट दिली. तेथे सुमारे १५ ते २० घरांतील लोकांना दिवाळीचा फराळ, कपडे, भांडी आणि इतर गृह उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. गरजू लोकांसाठी अत्यावश्यक असलेली ही मदत मिळाल्याने आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.

खेर्डीतील ‘विठ्ठलवाडी गणेश मंडळ’ ही एक सक्रिय सेवाभावी संस्था आहे. दरवर्षी ही संस्था विविध लोकोपयोगी आणि सामाजिक उपक्रम राबवत असते. त्याचप्रमाणे, यंदाही मंडळाने आपली दिवाळी गोरगरीब लोकांमध्ये जाऊन साजरी करण्याचा आदर्श पायंडा पाडला आहे. या सामाजिक उपक्रमात मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दरवर्षीप्रमाणे उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे आधारस्तंभ श्री. दशरथ शेठ दाभोळकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष श्री. शशांक भिंगारे, सल्लागार श्री. संभाजी दाभोळकर, माजी उपाध्यक्ष श्री. अजित वाडकर, खजिनदार श्री. दत्तात्रय (बाळू) कदम, तसेच श्री. शरद पवार, श्री. संदीप सुर्वे, श्री. राकेश दाभोळकर, श्री. संभाजी यादव, श्री. वैभव महाडिक, श्री. अभिजीत यादव, श्री. अमित (पिंट्या) यादव, श्री. वैभव गुरव, श्री. विकास पवार, श्री. दिनेश माटे, श्री. सम्राट भोसले, युवराज कवडे, जयेश वाडकर, जयंत वाडकर, पवन पवार, साईराज वाडकर, हर्ष वाडकर, सोमराज वाडकर, हणमंत भोयर, सुजल वाडकर, निखिल वाडकर, सुमित पवार, राजवर्धन यादव, समर्थ यादव, सार्थक पवार, अमेध दाभोळकर, अर्चीता दाभोळकर आणि अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळाच्या या कृतीने इतरांपुढेही समाजसेवेचा नवा आदर्श ठेवला आहे.

Total Visitor Counter

2685331
Share This Article