रत्नागिरी | प्रतिनिधी :
जग 5G च्या युगात वेगाने पुढे जात असताना सैतवडे गाव मात्र अजूनही BSNL च्या ढिम्म सेवेमुळे मागे पडले आहे. गेले 10 दिवस BSNL फायबर सेवा पूर्णपणे ठप्प असून गावातील वायफाय कनेक्शनचे दिवे अक्षरशः विझले आहेत. काही मिनिटांसाठी सेवा सुरु झाली तरी ती पुन्हा काही क्षणांत बंद पडते, अशी स्थिती आहे.
BSNL ने स्थानिक वायफाय सेवेसाठी रत्नागिरी येथील जिशान काझी (R.K. Cable) यांना काम दिले आहे. मात्र त्यांची सर्व्हिसही BSNL पेक्षाही निकृष्ट असल्याची ग्राहकांची तीव्र नाराजी आहे. वायफाय बंद झाल्यानंतर फोन करून तक्रार केली तरी ती दुरुस्त होण्यासाठी अनेक दिवस लागतात.
काझी आणि BSNL अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सैतवडे परिसरात वीजपुरवठा अनियमित असल्याने नेटवर्क बंद पडते आणि ‘रिफ्रेश’ केल्यानंतरच सेवा पुन्हा सुरू होते. मात्र हे ‘रिफ्रेश’ करण्यासाठीही दोन-दोन दिवस लागतात. दरम्यान, वीजपुरवठा समस्येवर उपाय म्हणून मशीन बसवण्याचे आश्वासन BSNL कडून गेल्या तीन महिन्यांपासून दिले जात आहे, पण आजतागायत ती मशीन बसवलेली नाही.
गेल्या शुक्रवारी बंद झालेली वायफाय सेवा काल तात्पुरती सुरू झाली, पण तासाभरात पुन्हा बंद पडली. त्यामुळे “BSNL कडून वायफाय सुरु करण्यापेक्षा बंद करण्याचीच स्पर्धा लागली आहे,” अशी ग्राहकांची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
या खराब सेवेमुळे सैतवडेतील नागरिक आणि ग्राहक संतप्त झाले असून, “अशीच परिस्थिती राहिली तर आम्ही BSNL फायबर सेवा बंद करून इतर कंपनीकडे वळू,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
सैतवडे गावात BSNL फायबरचा बोजवारा; 10 दिवसांपासून वायफाय ठप्प, नागरिक त्रस्त
