GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत बांधकाम साईटवर काम करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

Gramin Varta
9 Views

रत्नागिरी: शहरातील गोगटे कॉलेज परिसरात सुरू असलेल्या एका बांधकाम साईटवर विजेचा धक्का लागून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी ही घटना घडली असून, घटनेने बांधकाम कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्र गयाप्रसाद पासवन (वय २७, मूळ रा. फतेहपूर, उत्तर प्रदेश) हा गेल्या काही दिवसांपासून गोगटे कॉलेजजवळ सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकामावर काम करत होता. तो कौलगुड कन्स्ट्रक्शन मिरज या कंपनीसाठी सेंट्रिंग आणि स्टील बांधणीचे काम करत होता.

३१ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६.४० वाजण्याच्या सुमारास रामचंद्र हा इतर कामगारांसोबत स्टील कटिंग मशिनने वाइंडिंग वायर कापण्याचे काम करत होता. त्याच वेळी त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो जागीच बेशुद्ध पडला.

त्याच्यासोबत काम करणाऱ्या इतर कामगारांनी आणि साईट सिव्हिल इंजिनिअर कंदन उत्तम मगर (वय ४०) यांनी तात्काळ त्याला रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

मात्र, हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर रामचंद्र पासवनला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

2647179
Share This Article