जाकादेवी/वार्ताहर: रत्नागिरी तालुक्यातील जीवन विद्या मंडळ कसोप फणसोप (मुंबई) संचलित श्री लक्ष्मी केशव माध्यमिक विद्यालय, कसोप फणसोप येथील गरजू विद्यार्थ्यांना ‘विथ आर्या, दोन घास’ या स्वयंसेवी संस्थेकडून आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये दप्तर, छत्र्या आणि इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड यांसारख्या वस्तूंचा समावेश होता.
‘विथ आर्या, दोन घास’ ही संस्था अनेक वर्षांपासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम करत आहे. विशेष म्हणजे, सॅनिटरी पॅड हे या संस्थेचे स्वतःचे उत्पादन असून, त्याचे वाटप सर्वप्रथम श्री लक्ष्मी केशव माध्यमिक विद्यालयातील आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना करण्यात आले.
या प्रसंगी जीवन विद्या मंडळाचे अध्यक्ष कमलाकर साळवी, ज्येष्ठ शिक्षक मारुती चौगले, संतोष डोळे, रमा जोशी, साधना कुलकर्णी, आरोही गुरव हे उपस्थित होते. तसेच ‘विथ आर्या, दोन घास’ एनजीओ संस्थेच्या संस्थापक शीतल भाटकर, विशू बडगेरी, रिया भाटकर, हर्षद भाटकर, केतकी माहीमकर, राज जैन, शालिनी गोसालिया यांसह संस्थेचे अनेक सदस्य उपस्थित होते. या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.