GRAMIN SEARCH BANNER

आरोग्य मंदिर येथे छोटा हत्ती वीज खांबावर आदळून अपघात; वीज पुरवठा खंडित

Gramin Search
6 Views

रत्नागिरी: शहरातील आरोग्य मंदिर परिसरात सोमवारी (आज) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात छोटा हत्ती (टेम्पो) थेट वीज खांबावर आदळून मोठा अपघात घडला. या घटनेमुळे वीज खांबावर झालेल्या स्पार्किंगमुळे आणि मोठ्या आवाजामुळे परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती, तर वाहनचालक आणि पादचारी सैरभैर धावू लागले. या अपघाताने परिसरात खळबळ उडाली.

याबाबत मिळालेल्या सविस्तर वृत्तानुसार, अपघातग्रस्त टेम्पोचा चालक आरोग्य मंदिर येथून नाचणे पॉवर हाऊसच्या दिशेने जात होता. त्याच वेळी साळवी स्टॉपवरून स्टँडच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने अचानक टेम्पोला हुलकावणी दिली. दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी चालकाने प्रयत्न केले असता, टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि तो जोरदारपणे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका वीज खांबावर आदळला. या धडकेमुळे वीज खांबावर मोठ्या प्रमाणात स्पार्किंग होऊन मोठा आवाज झाला, ज्यामुळे नागरिक घाबरले.
या अपघातामुळे आरोग्य मंदिर ते साळवी स्टॉपपर्यंतच्या परिसरातील वीज पुरवठा तात्काळ खंडित झाला. घटनेची माहिती मिळताच, महावितरणचे कर्मचारी आणि वाहतूक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. काही वेळानंतर खांबावर आदळलेला टेम्पो बाजूला करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. या अपघातात टेम्पो चालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Total Visitor Counter

2645840
Share This Article