राजापूर, (प्रतिनिधी): कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीत एका ६७ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील ताम्हाणे, ताम्हणकरवाडी येथे घडली आहे. आरोपींनी फिर्यादीच्या घराजवळील झाडे तोडून नुकसान केले, तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना ३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी मनोहर सोमा ताम्हाणकर (वय ६७, रा. ताम्हाणे) हे त्यांच्या घरासमोर असताना शेजारी राहणारे त्यांचे चुलत भाऊ आरोपी संजय गोविंद ताम्हणकर (वय ५६), सिद्धेश श्रीधर ताम्हणकर (वय ३०) आणि संतोष श्रीधर ताम्हणकर (वय ३२) यांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी फिर्यादी मनोहर ताम्हाणकर यांच्या घराजवळील रातांबी, नारळ, सोनचाफा अशी झाडे तोडून टाकली. त्यानंतर बांबूच्या काठीने त्यांना दोन्ही पायांवर आणि पाठीवर मारहाण केली. मारहाणीत फिर्यादी मनोहर ताम्हाणकर यांना गंभीर दुखापत झाली आहे.
फिर्यादीची पत्नी भांडणे सोडवण्यासाठी मध्ये आली असता, आरोपी सिद्धेश ताम्हणकर याने तिच्या बरगडीजवळ हाताने ठोसे मारून तिलाही मारहाण केली. या घटनेनंतर आरोपी संतोष ताम्हणकर याने फिर्यादीला शिवीगाळ करत “तुमचे घर तोडून टाकतो, तुम्हाला बघून घेतो” अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
या घटनेची तक्रार मनोहर ताम्हाणकर यांनी ४ सप्टेंबर रोजी पोलिसात दाखल केली. राजापूर पोलिसांनी आरोपींविरोधात भादंसं कलम ११८(१), ११५(२), ३२४(१)(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.
राजापूर तालुक्यातील ताम्हाणे येथे कौटुंबिक वादातून वृद्ध शेतकऱ्यावर हल्ला
