GRAMIN SEARCH BANNER

निवळी-गणपतीपुळे मार्गावर ८ लाखांचा प्रतिबंधित पानमसाला जप्त, एक आरोपी गजाआड

रत्नागिरी: राज्य सरकारने आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधित केलेला पानमसाला आणि सुगंधीत तंबाखू रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाहतूक करताना पकडण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने  केलेल्या कारवाईत तब्बल ८ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की, निवळी ते गणपतीपुळे रस्त्यावरून एका पिकअप गाडीतून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखूची वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे, पोलीस हवालदार अमित अशोक कदम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १.३० वाजता निवळीजवळ रानवारा हॉटेलसमोर सापळा रचला.

यावेळी, संशयित बोलेरो पिकअप (एमएच-०८-एपी-४५४५) हे वाहन थांबवून त्याची तपासणी केली असता, त्यात विविध कंपन्यांचे पानमसाले आणि सुगंधीत तंबाखूचे मोठे पॅकेट आणि गोण्या आढळल्या. पोलिसांनी तात्काळ या वाहनातील माल आणि चालकाला ताब्यात घेतले. पकडलेल्या आरोपीचे नाव शिवाजी अनंतराव चव्हाण (वय ५०, रा. फणसोप सडा, ता. जि. रत्नागिरी) असे आहे.

पोलिसांनी जप्त केलेल्या मालामध्ये विविध ब्रँडचा पानमसाला आणि तंबाखूचा समावेश आहे, ज्याची एकूण किंमत ८ लाख ३० हजार १७० रुपये आहे. यात व्ही-१ तंबाखू, केसरयुक्त विमल पानमसाला तसेच इतर प्रतिबंधित पदार्थांचा समावेश होता. या सर्व मालासह पोलिसांनी सुमारे ७ लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप गाडीही जप्त केली आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार अमित कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गु.आर.नं. १६३/२०२५ नुसार, आरोपी शिवाजी चव्हाण यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १२३, २७४, २७५, २२३ सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम २६(२)(i), २६(२)(iv), २७(३)(d), ३०(२)(३), ३(१), (zz)(iv), ५९ अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई रत्नागिरी जिल्ह्यात प्रतिबंधित पदार्थांच्या अवैध वाहतुकीच्या मोठ्या रॅकेटचा भाग असू शकते असा पोलिसांना संशय असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Total Visitor Counter

2474942
Share This Article