मुंबई : राज्यात मागील दोन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, संपूर्ण राज्यात पावसाचा जोर शुक्रवारपासून पुन्हा वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
या कालावधीत अनेक भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. काही भागात कमी कालावधीत अधिक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
विजांसह जोरदार वारे मेघगर्जनेसह राज्यात सध्या पाऊस पडत आहे. काही भागात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतही पावसाची रिपरिप सुरूच आहे. दरम्यान, ईशान्य बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या प्रणालीपासून उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. यातच पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत गुरुवारपर्यंत नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचा अंदाज आहे.
किनाऱ्याकडे येताना ही प्रणाली तीव्र होणार आहे. परिणामी शुक्रवारपासून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. या कालावधीत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस सुरु असल्यामुळे या भागात अतिवृष्टीची नोंद होत आहे. पावसामुळे या भागात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकण तसेच घाटमाथ्यावरही पावसाचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. पाऊस सुरू असला तरी काही भागात उन्हाचा चटकाही जाणवत आहे. काही भागात कमाल तापमानाचा पारा ३० अंशापार आहे. वर्धा येथे मंगळवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तेथे ३५.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
राज्यात पावसाचा जोर शुक्रवारपासून पुन्हा वाढणार; काही भागांत अतिवृष्टीचा इशारा
