मुंबई: येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर बुधवारी मध्यरात्री भरधाव पोर्शे कार दुभाजकाला धडकली. या अपघातात कार चालक जखमी झाल्याची माहिती आहे. तर सोबत असलेल्या बीएमडब्ल्यू कारबाबत माहिती मिळालेली नाही.
आठवड्याभरात मुंबईत झालेला हा दुसरा मोठा कार अपघात आहे, ज्यातून चालक थोडक्यात बचावला आहे. दोन आलिशान गाड्या मध्यरात्रीच्या सुमारास रेस लावत असताना भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अपघातग्रस्त पोर्शे कार पूर्णपणे चेपलेली दिसत आहे. गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे, तर आलिशान कारचे तुकडे रस्त्यावर विखुरलेले पाहायला मिळाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी पोर्शे कार अतिप्रचंड वेगात होती. यावेळी कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नसली, तरी कार चालकाला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मुंबईत भरधाव पोर्शे कारची दुभाजकाला धडक, चालक जखमी
