GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण: भरधाव दुचाकीने पादचारी महिलेला चिरडले

Gramin Varta
231 Views

चिपळूण – सोमवारी, दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास चिपळूण येथील एन्रॉन ब्रीज, गुहागर बायपास रोडवर भरधाव वेगात आलेल्या मोटारसायकलने एका पादचारी महिलेला धडक दिल्याने यास्मीन मैनुद्दीन शेख (वय ३८, रा. उक्ताड, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) यांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत यास्मीन शेख या ‘मेजवान कॅफे पेटमाप’ येथून काम संपवून रात्री ८.२० वाजण्याच्या दरम्यान पायी चालत घरी परत येत होत्या. त्या एन्रॉन ब्रीज, गुहागर बायपास रोडवर पोहोचल्या असतानाच, एम.एच. ०८/३/६१२७ क्रमांकाची ‘शाइन’ मोटारसायकल घेऊन भरधाव वेगात आलेल्या चालकाने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. रस्त्याच्या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून, अत्यंत हयगयीने आणि बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे यास्मीन शेख यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा जीव गेला.

या घटनेची तक्रार तौसिफ दाऊद मुकादम (वय ३५, व्यवसाय- नोकरी, रा. उक्ताड, साखरवाडी, ता. चिपळूण) यांनी पोलिसांत दाखल केली. तक्रारीनुसार, चिपळूण पोलिसांनी मोटारसायकल चालक अश्रफ हुसेन मणिवार (रा. शिरळ मोरेवाडी रोड, ता. चिपळूण) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

हा गुन्हा ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता दाखल करण्यात आला असून, गु.आर.नं. २२१/२०२५ आहे. आरोपी अश्रफ मणिवारवर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१ (निष्काळजीपणाने मृत्यू घडवणे), १२५(अ), (ब), कलम १०६ (१) आणि मोटार वाहन कायदा (मो वा का.क.) कलम १८४ (धोकादायक वाहन चालवणे) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी अपघाताची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

Total Visitor Counter

2645821
Share This Article