चिपळूण: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील नायशी गावचा सुपुत्र, अवघ्या १९ वर्षांचा रोहन राजन घाग याने नुकत्याच पार पडलेल्या मुंबई प्रीमियर लीग (MPL) T20 2025 स्पर्धेत आपल्या भेदक गोलंदाजीने लक्ष वेधून घेतले आहे. तो मराठा रॉयल्स संघाचा अविभाज्य भाग होता, आणि विशेष म्हणजे त्याच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे मराठा रॉयल्स संघाने यंदाच्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
रोहनच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी दूरध्वनीवरून त्याचे अभिनंदन केले आहे. तसेच, नायशी पंचक्रोशीतून आणि संपूर्ण चिपळूण तालुक्यातून रोहनवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, ज्यामुळे कोकणवासीयांना त्याच्या कामगिरीचा अभिमान वाटत आहे.
डाव्या हाताचा जलदगती गोलंदाज म्हणून रोहन घागने स्पर्धेत संघासाठी अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली. आपल्या अचूक आणि वेगवान गोलंदाजीने त्याने अनेक महत्त्वाच्या क्षणी संघाला यश मिळवून दिले. त्याच्या भरीव योगदानामुळेच मराठा रॉयल्स संघाने स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजवत विजेतेपद पटकावले.
रोहनचे मूळगाव नायशी असून, त्याला लहानपणापासूनच क्रिकेटचे वेड होते. त्याने अगदी लहानपणापासूनच क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. सध्या तो मुंबईतील शिवडी येथे राहत असून, वरळी येथील पोद्दार महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्याच्या या यशस्वी कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाची थाप पडत आहे.
केवळ १९ वर्षांचा असूनही, रोहन गेल्या काही वर्षांपासून मुंबई क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. गेल्या वर्षी त्याने मुंबईच्या १९ वर्षांखालील (U-19) संघाचे यशस्वी प्रतिनिधित्व केले होते. रिलायन्स टूर्नामेंट आणि कूच बिहार टूर्नामेंट यांसारख्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्याने चांगला खेळ करत मोलाचा अनुभव मिळवला आहे. याव्यतिरिक्त, गेल्या काही वर्षांत त्याने कांगा लीग, टाइम्स शील्ड, राठोड ट्रॉफी, प्रेसिडेंट कप, पुरुषोत्तम शील्ड, इंटर कॉलेज टूर्नामेंट अशा विविध प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये फास्ट बॉलर म्हणून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. नायशी गाव तसेच चिपळूण तालुक्यासह संपूर्ण कोकणवासीयांना अभिमानास्पद असलेल्या या युवा जलदगती गोलंदाजाला भविष्यात भारतीय संघात निवड होण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आला.