GRAMIN SEARCH BANNER

‘आपले सरकार’ व्हॉट्सॲपवर उपलब्ध होणार.. मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

मुंबई : राज्य शासनाच्या विविध विभागांकडून ‘आपले सरकार’ संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा आता व्हॉट्सॲपवरही पुरवण्यात याव्यात. तसेच सर्व सेवा योग्यप्रकारे आणि गरजेनुसार पुरवण्याच्या दृष्टीने सर्व तालुक्यांमध्ये एक साखळी तयार करण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले.

सरकारच्या ‘सेवा सुलभीकरण’ धोरणांतर्गत राज्यातील नागरिक सेवांसंदर्भातील आढावा बैठकीत फडणवीस बोलत होते. बृहन्मुंबई महापालिकेच्या एकाच प्रकारच्या नऊ सेवा एकत्र करण्याचे आदेश फडणवीस यांनी या वेळी दिले. तसेच सेवा पुरवठ्याच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत नियमित पडताळणी करण्यात यावी, अर्ज प्रक्रियेत लागणारी कागदपत्रांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले.

सर्व जिल्हा परिषद, महापालिका आणि विद्यापीठांचे ‘डॅशबोर्ड’ एकसमान असावेत, जेणेकरून राज्यभरातील नागरिकांना एकसंध अनुभव मिळेल, या सेवेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी साखळी (रिंग) व क्लस्टर प्रणाली राबवण्यात यावी. रिंगमध्ये सुुरुवातीस त्या तालुक्यातील १० ते १२ गावांचा समावेश असावा व गरजेनुसार सेवा पुरवण्यात याव्यात. या रिंगच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र गट व व्यवस्थापन टीम तयार करावी. तसेच सेवा पुरवण्यासाठी ‘डिश डिजिटल सेवा हब’चा वापर करण्याचे आदेशही फडणवीस यांनी दिले.

राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अपर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटीया, महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर आदी या वेळी उपस्थित होते.

२३६ सेवांची वाढ

मुख्य सचिव राजेश कुमार यांनी या वेळी सेवा वितरणात अपीलची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आणि प्रमाणपत्र वितरणासाठी ई-मेल, संकेतस्थळ, व्हॉट्सअॅप आदी साधने वापरण्याच्या सूचना दिल्या. ‘आपले सरकार’ संकेतस्थळाच्या माध्यमातून सध्या राज्यात १००१ सेवा पुरवण्याचे काम सुरू आहे. त्या पैकी ९९७ सेवा सर्व संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गेल्या १५ दिवसांमध्ये संकेतस्थळावर उपलब्ध सेवांमध्ये २३६ सेवांची वाढ झाली आहे.

Total Visitor Counter

2475011
Share This Article