रत्नागिरी: प्रेयसीशी सतत बोलतो या रागातून मामाने भाच्याचा खून केल्याची घटना शहरातील मिरकरवाडा येथे घडली होती. प्रिन्स निषाद (19,रा.उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर खून करून फरार होणाऱ्या मामाला रत्नागिरी रेल्वे स्थानकावर शनिवारी पोलिसांनी पकडले होते. निरज तेजप्रताप निषाद (21, रा. सिकतौर जि. गोरखपूर, उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या मामाचे नाव आहे. त्याला रविवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मिरकरवाडा येथे नव्याने सुरु होणार्या मोबाईल शॉपीत फर्निचरचे काम करणार्या प्रिन्स निषाद (19,रा.उत्तरप्रदेश) या तरुणाच्या छातीत आरी खूपसून त्याचा खून करण्यात आला होता. निरज तेजप्रताप निषाद याच्याविरोधात मोबाईल शॉपी मालक सुहेब हिदायत वस्ता (40, रा. उद्यमनगर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, मिरकरवाडा येथील खडप मोहल्ला येथे ते मोबाईल शॉपी सुरु करत होते. त्यासाठी लागणारे फर्निचर बनवण्याचे कॉन्ट्रॅक्ट त्यांनी रवि कुमारला दिले होते. रवि कुमारकडे निरज निषाद, मयत प्रिन्स निषाद आणि अनूज चौरसिया हे तिघे कामगार म्हणून कामाला होते. यातील निरज निषाद हा प्रिन्स निषादचा चुलत मामा होता. शनिवारी दुपारी हे सर्वजण मोबाईल शॉपीमध्ये फर्निचरचे काम करत होते. त्यावेळी प्रिन्स हा कामाच्या वेळेत सतत प्रेयसीसाबत फोनवर बोलत असल्याने निरज आणि प्रिन्स यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्यावर त्यांच्यात हाणामारी होउन निरुजने रागाच्या भरात बाजूची आरी घेउन प्रिन्सच्या छातीत खूपसली.
आरीचा वार वर्मी लागल्याने प्रिन्स रक्ताच्या थारोळ्यात मोबाईल शॉपीमध्ये आडवा पडला. त्यानंतर निरजने अनूज चौरसीयाला सोबत घेउन घटनास्थळावरुन पळ काढला होता. दरम्यान, रवि कुमाराने याबाबत शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर शहर पोलिसांनी मोबाईल लोकेशनव्दारे दोघांनाही रेल्वेस्टेशन येथून ताब्यात घेतले. शनिवारी रात्री उशिरा निरज निषाद विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 103(1),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.