GRAMIN SEARCH BANNER

माजी आमदार संजय कदम, वैभव खेडेकरांसह ३३ जण निर्दोष

खेड:- २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर सायंकाळच्या सुमारास जमाव करत बेकायदेशीरपणे रॅली काढून आचारसंहितेसह मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याच्या ठपक्यातून माजी आमदार संजय कदम, मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह ३३ जणांची येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चव्हाण यांनी निर्दोष मुक्तता केली. संशयितांच्यावतीने ॲड. अश्विन भोसले यांनी काम पाहिले.

२०१९मध्ये संजय कदम विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर २०१९ मध्ये मतदान प्रक्रिया सुरू असतानाच मतदानानंतर संजय कदम, वैभव खेडेकर व अन्य कार्यकर्त्यांनी सायंकाळी चारचाकी वाहने व दुचाकींवरून कर्णकर्कश हॉर्न वाजवत रॅली काढली होती. भरणेतील काळकाई मंदिर येथे रात्री ८.३०च्या सुमारास पोलीस यंत्रणेने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता संजय कदम यांनी रॅली काढणारच, तुम्हांला काय गुन्हे दाखल करायचे ते करा, असे पोलिसांनाच सुनावले होते.

आचारसंहितेसह मनाई आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवत संजय कदम, सायली संजय कदम, साहिल संजय कदम, मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, अजय रमेश पिंपरे, तौसिफ शौकत सांगले, प्रमोद पांडुरंग जाधव, धीरज सुनील कदम, ओंकार प्रकाश कदम, पंकज पांडुरंग जाधव, दादू नांदगांवकर, स. तू कदम, सुनील दत्ताराम चव्हाण, प्रसाद कदम, विनोद तांबे, विजय जाधव, सुरेश मोरे, राहुल कोकाटे, बाबा मुदस्सर, प्रकाश शिगवण, सतीश वसंत कदम, सचिन जाधव, इम्तियाज खलिफ, प्रदोष सावंत, चेतन धामणकर यांसह अन्य जणांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी चव्हाण यांच्यासमोर गुरुवारी सुनावणी झाली असता अॅड. भोसले यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत ३३ जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणी २८ साक्षीदार तपासण्यात आले.

Total Visitor Counter

2455447
Share This Article