रत्नागिरी : शहरातील भवानी नगर येथील एका तरुणाला १० दिवसांपूर्वी बैलांच्या झुंजीमुळे झालेल्या अपघातात गंभीर दुखापत झाली होती. या अपघातानंतर तो बेशुद्धावस्थेत होता, तर उपचारादरम्यान त्याचा शुक्रवारी, १० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने रत्नागिरी शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
मयत तरुणाचे नाव धैर्यशील सदाशिव देसाई (वय ३४, रा. भवानी नगर, रत्नागिरी) असे आहे. धैर्यशील देसाई हा दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या ज्युपिटर दुचाकीवरून घरी परतत होता. याच वेळी अचानक रस्त्यावर दोन बैलांची झुंज सुरू झाली. झुंजणाऱ्या बैलांमुळे गोंधळ निर्माण होऊन त्याचा परिणाम म्हणून देसाई यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि ते रस्त्यावर खाली कोसळला.
या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने बेशुद्ध झाला. त्याला तातडीने रत्नागिरीतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेली दहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने १० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.
या घटनेची माहिती मयत तरुणाची बहीण पल्लवी देसाई यांनी रत्नागिरी शहर पोलिसांना दिली. शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.