रत्नागिरी: हातखंबा, कदमवाडी येथे १७ सप्टेंबर रोजी दिवसाढवळ्या दोन घरांना लक्ष्य करून अज्ञात चोरट्यांनी २ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११:४५ ते दुपारी ३:१५ या वेळेत घडली. फिर्यादी संजय शिवराम कदम (४१, रा. हातखंबा, कदमवाडी) यांच्या घरी कोणीही नसताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या पाठीमागील सिमेंटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील कपाटाचे लॉकर तोडून त्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.
चोरट्याने सुमारे ४०,००० रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे कानातील जोड, २५,००० रुपये किमतीची ५ ग्रॅमची सोन्याची चेन, १५,००० रुपये किमतीची ३ ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि १,३५,००० रुपये रोख, असा एकूण २ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याच दिवशी, कदमवाडीजवळील तारवेवाडीमध्ये राहणारे रमेश रत्न तारखे यांच्या घरालाही चोरट्यांनी लक्ष्य केले. त्यांच्या घराचा मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरात कोणीही नसताना चोरट्यांनी लोखंडी कपाटातील पैसे चोरून नेले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या दोन्ही घटना एकाच दिवशी आणि दिवसा घडल्यामुळे चोरट्यांनी या भागातील घरांची रेकी केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
रत्नागिरी : हातखंबा येथे भरदिवसा 2 घरे फोडली, २ लाखांचा ऐवज लंपास
