तुषार पाचलकर/ संगमेश्वर : तालुक्यातील तुरळ सांगडेवाडी येथे आज (रविवार, २७ जुलै) सकाळी ७.३० च्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. श्री. मधुकर चव्हाण यांच्या घरामागील कोंबड्याच्या पोल्ट्री फार्ममध्ये अचानक बिबट्या शिरल्याची माहिती समोर आली. मनसेचे जिल्हा प्रमुख जितेंद्र चव्हाण यांनी ही बाब तत्काळ वनविभागाच्या संगमेश्वर-देवरुख परिमंडळ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, वनविभागाच्या रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोल्ट्रीमध्ये अडकलेला बिबट्या प्रत्यक्ष पाहून ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे पोलीस निरीक्षक संगमेश्वर यांच्या मदतीने गर्दी हटवण्याचे काम करण्यात आले. वनविभागाने खबरदारी घेत पोल्ट्री फार्मभोवती शेडनेट लावले व मुख्य प्रवेशद्वारावर पिंजरा बसवून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न सुरू केला.
बिबट्या चार स्वतंत्र कंपार्टमेंटमध्ये फिरत असल्यामुळे रेस्क्यू अधिक कठीण झाला. मात्र, वन कर्मचाऱ्यांनी अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश मिळवले.
या वेळी परीक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार, परिमंडळ अधिकारी न्हाणू गावडे, वनरक्षक कराडे, आकाश कडुकर, सुप्रिया काळे, शर्वरी कदम, सुरज तेली, रणजीत पाटील तसेच निसर्गमित्र महेश धोत्रे व अनुराग आखाडे, संदीप गुरव आदी उपस्थित होते. पोलिस विभागातून पोलीस निरीक्षक चव्हाण, उपनिरीक्षक गावित, हेडकॉन्स्टेबल जाधव, वानरे, कॉन्स्टेबल लोखंडे आणि खाडे यांनी सुरक्षा व्यवस्था सांभाळली.
ग्रामपंचायतीचे सरपंच सहदेव सुवरे, उपसभापती दिलीप सावंत, पोलीस पाटील वर्षा सुर्वे, संजय धाकटे, अनंत पाध्ये तसेच पत्रकार दीपक तुळसणकर, मिलिंद चव्हाण हेही घटनास्थळी उपस्थित होते.
बिबट्याची पशुवैद्यकीय तपासणी कडवई येथील डॉ. बेलोरे यांनी केली. सदर प्राणी मादी असून तिचे वय अंदाजे अडीच ते तीन वर्ष आहे. ती पूर्णपणे तंदुरुस्त असल्याने तिला नंतर सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
ही संपूर्ण कार्यवाही विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला दिलेल्या सहकार्याबद्दल अधिकारी वर्गाने आभार मानले आहेत.
वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास टोल फ्री १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई यांनी केले आहे.
संगमेश्वर: तुरळ येथे कोंबड्याच्या पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्या शिरला; तब्बल अडीच तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून यशस्वी रेस्क्यू
