GRAMIN SEARCH BANNER

अकरावी प्रवेशाची १७ जुलैला दुसरी गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांना रविवारपर्यंत बदलता येणार पसंतीक्रम

मुंबई : इयत्ता अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी आता १७ जुलैला जाहीर होणार आहे. तत्पूर्वी, १३ जुलैपर्यंत प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना अर्जातील भाग-एक भरता येईल व पूर्वी भरलेल्या माहितीत दुरुस्ती देखील करता येणार आहे.

याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश मिळालेला नाही, त्यांना एक ते दहा महाविद्यालयांचा पसंतीक्रम बदलता येणार आहे तथा नवा पसंतीक्रम भरता येणार आहे.

राज्यातील २१ लाख विद्यार्थी दहावीची बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. पण, त्यातील केवळ पाच लाख आठ हजार विद्यार्थ्यांनीच आतापर्यंत इयत्ता अकरावीसाठी प्रवेश घेतला आहे. पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यावर राज्यभरातील सुमारे एक लाख विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नव्याने नोंदणी केली आहे. अकरावीसाठी प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १६ लाखांपर्यंत असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे. यंदा प्रथमच अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबविली जात असल्याने विद्यार्थ्यांची वस्तुनिष्ठ माहिती समोर येणार आहे.

सध्या राज्यभरातील विविध शाखांच्या (विज्ञान, कला, वाणिज्य) तीन हजार तुकड्यांमध्ये एकाही विद्यार्थ्याने प्रवेशासाठी अर्ज केलेला नाही. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे अनेक तुकड्यांना कुलूप लावावे लागू शकते, अशी स्थिती आहे. पहिल्या गुणवत्ता यादीनुसार नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांचे (विशेष: शहरी भागातील) मेरिट ८० ते ८८ टक्क्यांहून अधिक असल्याने अनेकांना प्रवेश मिळालेला नाही. दुसऱ्या गुणवत्ता यादीनंतर सुमारे सात ते आठ लाख विद्यार्थी प्रवेश घेतील, असा विश्वास शिक्षण विभागाला आहे.

प्रवेशाचे पुढील वेळापत्रक असे…

१० ते १३ जुलै : अर्जातील भाग एक-दुरुस्ती, पसंतीक्रम बदलण्याची संधी

१७ जुलै : दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध

१८ ते २१ जुलै : विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल

२३ जुलै : दुसऱ्या गुणवत्ता यादीनंतर रिक्त राहिलेल्या जागा जाहीर होणार

२८ जुलै : तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध

अकरावीचे वर्ग ऑगस्टमध्ये अन् परीक्षा‌…

इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया जुलैअखेर चालणार आहे. १६ जुलैपर्यंत अवघ्या पाच लाख विद्यार्थ्यांचेच प्रवेश झाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आणखी १५ ते २० दिवस लागतील. त्यामुळे यंदा दहावीचा निकाल नेहमीपेक्षा लवकर जाहीर झालेला असताना देखील पहिल्यांदाच अकरावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग ऑगस्ट महिन्यात सुरू होणार आहेत. त्यामुळे एप्रिल-मेअखेर या विद्यार्थ्यांची परीक्षा होईल.

Total Visitor Counter

2475011
Share This Article