GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी करबुडे येथील वृद्धाची आत्महत्या; गावात खळबळ

रत्नागिरी: दारूच्या व्यसनामुळे त्रस्त झालेल्या एका ६० वर्षीय व्यक्तीने करबुडे गावात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गजानन तुकाराम पवार (वय ६०, रा. करबुडे) असे या मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांनी राहत्या घरासमोरच गळफास लावून घेतला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

गजानन पवार यांना दारूचे प्रचंड व्यसन होते. त्यांची पत्नी सुमारे पंधरा वर्षांपूर्वीच मरण पावली होती. यामुळे ते एकटेच राहत होते. त्यांच्या व्यसनामुळे ते सतत मानसिक तणावाखाली होते, अशी माहिती समोर येत आहे. गुरुवार, १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.४५ च्या सुमारास गजानन पवार यांनी आपल्या घरासमोर असलेल्या अंगणाच्या छताच्या लोखंडी पाईपला इलेक्ट्रिक वायरच्या साहाय्याने गळफास घेतला. रात्री उशिरापर्यंत ते नजरेस न पडल्याने कुटुंबीयांनी व शेजाऱ्यांनी शोधाशोध केली असता, ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

2455556
Share This Article