GRAMIN SEARCH BANNER

दापोलीच्या सड्यांवर फुलली ‘कोकणची फुलराणी’! दिपकाडीच्या पुनर्वसनाचे मोठे यश

दापोली: कोकणातील पुष्पप्रजातींची राणी म्हणून ओळखली जाणारी आणि ‘संकटग्रस्त’ यादीत समाविष्ट असलेली ‘एकदांडी’ म्हणजेच ‘दिपकाडी कोंकणेन्स’ या दुर्मिळ प्रजातीने दापोली तालुक्याच्या सड्यांवर प्रथमच आपले सौंदर्य उधळले आहे. तिच्या मूळ अधिवासापासून साधारण ९० किलोमीटर हवाई अंतरावर असलेल्या दापोलीत या प्रजातीचे यशस्वी पुनर्वसन करण्यात वनस्पतीशास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले असून, यामुळे निसर्गप्रेमी आणि अभ्यासकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

गेल्या दशकभरापासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील निवडक सड्यांवर आढळणाऱ्या या प्रजातीचे वनस्पतीशास्त्रज्ञांनी दापोलीत रोपण केले होते. यंदा हे रोपण पूर्णतः यशस्वी ठरले असून, दापोलीतील अडखळ, महामाईनगर आणि वळणे पठार अशा एकूण चार सड्यांवर दिपकाडीचे हजारो फुले उमलून आली आहेत. या यशामुळे ‘आययूसीएन’च्या लाल यादीतील या ‘संकटग्रस्त’ प्रजातीच्या संवर्धनाला मोठा हातभार लागला आहे.

‘दिपकाडी कोंकणेन्स’ या शास्त्रीय नावाने ओळखली जाणारी ही प्रजात केवळ पावसाळी हंगामात बहरते. स्थानिक पातळीवर तिला ‘एकदांडी’, ‘गौरीची फुलं’ किंवा ‘ढोकाची फुलं’ अशा नावांनीही ओळखले जाते. कोकणात अतिशय तुरळक ठिकाणी, मात्र संख्येने भरपूर प्रमाणात वाढणाऱ्या या वनस्पतीचा बहर अंदाजे ३० ठिकाणांवर नोंदवण्यात आला आहे. या प्रजातीच्या मूळ अधिवासाचा विस्तार उत्तरेकडे देवरुखपासून दक्षिणेकडे गोव्यातील मोपाच्या सड्यापर्यंत असून, प्रामुख्याने रत्नागिरी, राजापूर, देवगड ते वेंगुर्ला तालुक्यापर्यंत पसरलेल्या किनाऱ्यावरील सड्यांवर ही वनस्पती फुलते. महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांपुरती ती प्रदेशनिष्ठ असल्याने, तिच्या संवर्धनाची निकड अधिक आहे.

‘आययूसीएन’साठी या वनस्पतीचे मूल्यांकन करणारे वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. अमित मिरगळ यांनी २०१२ पासून ‘एकदांडी’चे सखोल संशोधन करत आहेत. या प्रजातीचे मर्यादित अधिवास क्षेत्र लक्षात घेऊन, डॉ. मिरगळ यांनी २०१३ साली ‘एकदांडी’च्या काही बिया दापोली तालुक्यातील दहा ते बारा सड्यांवर रोपणासाठी टाकल्या होत्या. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे दशकभरानंतर गेल्यावर्षी अडखळ आणि महामाईनगर येथील सड्यांवरील बिया अंकुरित झाल्या आणि यंदा वळणे पठारावरही दिपकाडीचा बहर पाहायला मिळत आहे. दापोलीतील हा बहर पाहण्यासाठी डॉ. अमित मिरगळ यांच्याशी ९१५२११५७३७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

- Advertisement -
Ad image

या प्रजातीला लेटराईट माती, योग्य पाणी निचरा आणि अर्ध-छायांकित वातावरण आवश्यक असल्याने, योग्य निवासस्थान निवड, मातीची तयारी आणि हवामान परिस्थितीचे विश्लेषण करून नवीन ठिकाणी हे यशस्वी रोपण करण्यात आले आहे. ‘वाइल्ड अॅनिमल रेस्क्यू आणि रिसर्च संस्था’, दापोली आणि ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’, देवरुख यांच्या मदतीने पुढील ५ वर्षांत या प्रजातीचे आणखी १० नवीन ठिकाणी पुनर्वसन करण्याची योजना आखली आहे. बीज बँक स्थापना, अनुवंशिक संसाधन संरक्षण आणि इको-टूरिझम विकास यासंदर्भातील काम सुरू असून, ‘लोकसहभागातून दिपकाडी संवर्धन’ या भावनेतून हा उपक्रम राबवला जात आहे, असे डॉ. अमित मिरगळ यांनी सांगितले. दापोली आणि परिसरातील मालकी हक्काचे कातळ उपलब्ध असणाऱ्या शेतकरी, अभ्यासक, संस्था यांनी पुढाकार घेऊन या प्रकल्पास हातभार लावण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. दापोलीतील हे यश निसर्गसंवर्धनाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड ठरले आहे.

Total Visitor

0217586
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *