GRAMIN SEARCH BANNER

कोल्हापूर : गणेशोत्सवात लेझर लाइटला बंदी; नियम मोडल्यास थेट गुन्हा दाखल

कोल्हापूर: जिल्ह्यात २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरच्या दरम्यान होत असलेल्या गणेशोत्त्सवात गणेशमूर्ती आगमन, घरगुती गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक तसेच इतर कार्यक्रमांदरम्यान लेझर लाईटच्या वापरावर बंदी आणण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हा आदेश दिला असून, हा नियम मोडल्यास थेट फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

कोल्हापुरात गणेशोत्सव मिरवणुकीत गतवर्षी गणेशमूर्ती मिरवणुकीसाठी आलेल्या भाविकांच्या डोळ्यावर लेझर लाइट पडल्याने, काही व्यक्तींचा डोळ्याचा पडदा फाटला होता, तर काहींच्या बुब्बळाला इजा झाल्या होत्या.या गंभीर घटना घडल्यानंतर कायद्याचे डोळे उघडले होते. गतवर्षी डोळ्यांवर उपचार करणारे ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटीनेही लेसर लाइट्सवर बंदी घालण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. तक्रारींचा ओघ वाढल्यानंतर धोका लक्षात घेऊन गतवर्षी प्रशासनाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (१) नुसार गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाइट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. कार्यवाहीसाठी पोलिसांना सूचनाही दिल्या होत्या.

जिल्हा प्रशासनाने बंदी आदेश जारी करताच ॲक्शन मोडवर आलेल्या पोलिसांनी मिरवणुकीत लेसर लाइट्स आणि डीजे लाइटचा वापर करणाऱ्या सुमारे ३०० मंडळांवर कायदेशीर कारवाई केली. लाइट्स आणि ध्वनियंत्रणा पुरविणाऱ्या संघटनेसही पोलिसांनी बंदी आदेशाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Total Visitor Counter

2455622
Share This Article