GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी हरचेरी येथे गायीच्या शेणापासून गणेश मूर्ती, पर्यावरणपूरक ‘गव्य गणेश’चा अभिनव उपक्रम

Gramin Varta
12 Views

सचिन यादव / संगमेश्वर

गणेशोत्सव जसजसा जवळ येतो आहे, तसतसे पर्यावरणपूरक मूर्तींची मागणी वाढू लागली आहे. शाडूमाती आणि कागदी लगद्यापासून तयार मूर्तींपेक्षा अधिक नैसर्गिक व पवित्र मानल्या जाणाऱ्या गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गणेश मूर्तींना सध्या मोठी पसंती मिळत आहे. हरचेरी येथील दीपाली प्रणीत या पर्यावरणप्रेमी गृहिणीने गायीच्या शेणापासून ‘गव्य गणेश’ नावाने पूर्णपणे पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.

दीपाली या पेशाने वकील असून त्यांच्या पती प्रणीत हे इंजिनिअर आहेत. दोघांनीही मुंबईतील आपले करिअर सोडून निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा निर्णय घेतला. कोरोना काळात त्यांनी हरचेरी येथे २४ एकर जमीन कराराने घेतली आणि ‘हॅपी ईको व्हिलेज’ ही संकल्पना राबवायला सुरुवात केली. सेंद्रिय शेती, गोपालन, काळी हळद लागवड, इत्यादी विविध पर्यावरणपूरक उपक्रम ते राबवत आहेत.

गोशाळा विकसित करताना गायीच्या शेणाचा विविध उपयोग शोधत असताना, गणेश मूर्ती तयार करण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. हिंदू धर्मशास्त्रात देशी गायीच्या शेणाला पवित्र मानले जाते आणि त्यामुळे मूर्ती बनवण्यासाठी याचाच वापर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शाडू माती पाण्यात विरघळली तरी ती झाडांसाठी उपयुक्त नसते, तर कागद विरघळत असला तरी त्याचे कण पाण्यात अडथळा निर्माण करतात. याउलट शेण संपूर्णपणे विघटित होणारे व खतासारखे कार्य करणारे असल्याने ‘गव्य गणेश’ या मूर्ती पर्यावरण पूरकतेचा सर्वोत्तम पर्याय ठरत आहेत.

या मूर्ती तयार करण्यासाठी देशी गायीचे शेण व स्थानिक लाल माती यांचे मिश्रण वापरले जाते. फेब्रुवारीपासून मूर्ती तयार करण्यास सुरुवात होते आणि एप्रिल-मे दरम्यान त्या उन्हात सुकवल्या जातात. काही मूर्ती रंगवलेल्या असतात तर काही नैसर्गिक रंगातच विकल्या जातात. गेल्या वर्षी त्यांनी १०० मूर्ती तयार केल्या होत्या, तर यंदा ६ इंच ते ३ फूट उंचीच्या ३०० मूर्ती त्यांनी तयार केल्या असून, त्यांची किंमत ७०० ते ४५०० रुपये आहे. या मूर्ती मुंबई, पुणे तसेच कोकणातही विकल्या जात आहेत.

नैसर्गिक आणि शास्त्रसंगत मूर्ती

“शाडू किंवा कागदाच्या मूर्ती १००% पर्यावरणपूरक नाहीत. गायीच्या शेणापासून बनवलेले ‘गव्य गणेश’ हे पूर्णतः नैसर्गिक आणि शास्त्रसंगत आहेत. विज्ञान व धर्मशास्त्र यांचा मेळ गव्य गणेशात साधला गेला आहे.”
– दीपाली प्रणीत

Total Visitor Counter

2645854
Share This Article