रत्नागिरी : दीर्घकाळ मधुमेह (डायबेटीस) आणि हृदयविकाराने त्रस्त असलेल्या शहरातील एका ६४ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी, २७ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी रत्नागिरी शहरात घडली. घरात झोपलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
स्मिता सुरेश पावसकर (वय ६४, रा. तेली आळी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेची माहिती त्यांचे पुत्र अक्षय सुरेश पावसकर यांनी रत्नागिरी शहर पोलिसांना दिली.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मयत स्मिता पावसकर यांना गेल्या सुमारे पाच वर्षांपासून मधुमेह आणि हृदयविकाराचा त्रास होता. या आजारांवर त्यांच्यावर यापूर्वी अँजिओप्लास्टी आणि अँजिओग्राफीसारखे उपचार करण्यात आले होते. सध्या रत्नागिरीतील डॉ. परकार हॉस्पिटलमध्ये त्यांचे औषधोपचार सुरू होते.
शनिवारी, २७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारच्या सुमारास त्यांचा मुलगा अक्षय पावसकर हे दुपारी २ वाजता त्यांच्या मित्राला (शार्दुल कीर) त्याच्या कार्यालयात सोडण्यासाठी गेले होते. ते सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घरी परतले. घरी आल्यावर त्यांची आई स्मिता पावसकर या झोपलेल्या दिसल्या. जेव्हा अक्षय पावसकर त्यांना उठवण्यासाठी गेले, तेव्हा त्यांच्यात कोणतीही हालचाल दिसली नाही. हे पाहून कुटुंबीयांनी तातडीने खाजगी ॲम्ब्युलन्समधून त्यांना उपचाराकरिता सायंकाळी ६.५५ वाजता रत्नागिरीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (जिल्हा रुग्णालय) दाखल केले. मात्र, येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. तफन गुप्ता यांनी तपासणीअंती स्मिता पावसकर यांना औषधोपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले.
रत्नागिरी : तेली आळी येथील वृद्धेचा अकस्मिक मृत्यू
